लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चार पथकांनी दिनांक ३० डिसेंबर रोजी हॉटेल, ढाबे अशा ७ ठिकाणी टाकलेल्या धाडीत ९ लीटर देशी दारु, २० लीटर विदेशी दारु व १९ लीटर बिअर जप्त केली असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभाग, बीडचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा भरारी पथक व बीड विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकाने गेवराई तालुक्यातील बेलगाव शिवारात ‘हॉटेल सिंधुदुर्ग’ धाब्यावर धाड टाकून गणेश जगताप याच्याकडून व्हिस्कीच्या ८ बाटल्या असा १,१२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच गेवराई तालुक्यातील तळेगाव शिवारात ‘हॉटेल सरपंच’ येथून विदेशी मद्याच्या ९ बाटल्या असा १,३५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दिगांबर हरी आडे याला अटक केली. त्यानंतर वडगाव शिवारातील ‘हॉटेल कन्हैय्या’वर धाड टाकून १८० मिली क्षमतेच्या व्हिस्कीच्या १५ बाटल्या व दारु वाहतुकीसाठी वापरलेली एक दुचाकी असा एकूण ३९ हजार ३८० रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन ढाबाचालक कृष्णा शामराव मुंडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
या पथकाने रात्री साडेनऊच्या सुमारास बीड तालुक्यातील आनंदवाडी शिवारातील ‘हॉटेल हवेली’ येथे धाड टाकून विदेशी मद्याच्या २४ व बीअरच्या ३० बाटल्या असा ९ हजार १८० रूपयांचा दारुसाठा जप्त करून हॉटेल मालक सुहास राजाभाऊ काशिद याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक कडवे, बीडचे दुय्यम निरीक्षक शेळके, जवान अमिन सय्यद, सांगुळे, मस्के, गोणारे व वाहनचालक शेळके यांनी केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबाजोगाई विभागात निरीक्षक गायकवाड, दुय्यम निरीक्षक पिकले, जवान पाटील व वाहनचालक डुकरे यांच्या पथकाने जवळगाव शिवारात ‘प्रांजल ढाबा’ येथून ६ हजार २२० रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या ४३ बाटल्या जप्त करुन शेख चांद शेख बक्शू याला अटक केली. तर दुय्यम निरीक्षक आल्हाट, भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक घोरपडे, जवान सादेक अहमद व धस यांच्या पथकाला परळी तालुक्यातील मांडखेल येथील पत्र्याच्या शेडमध्ये देशी दारुच्या ४८ बाटल्या आढळल्याने याप्रकरणी महादेव विट्ठल नागरगोजे याला अटक केली आहे.
बनावट देशी दारू व साहित्य पकडले
उत्पादन शुल्कच्या पथकाने गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव शिवारात ‘हॉटेल जय विजय ढाब्या’वर धाड टाकली. तेथे १८० मिली क्षमतेच्या बनावट देशी दारु भरलेल्या १५ बाटल्या आढळल्या. यावेळी पडताळणी केली असता, बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्यही सापडल्याने धाबामालक विजय बाबुराव आव्हाड (रा. जांभळी, पाथर्डी, जि.अहमदनगर) व सुरेश पुंजाराम टेकाळे (रा. नागझरी, पो. रेवकी, ता. गेवराई) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यात बनावट देशी दारु व इतर साहित्य असा २० हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.