परळी : किराणा दुकानासाठी अडीच कोटीचे कर्ज मंजूर केल्याचा मोबदला म्हणून दहा लाख रुपयाची लाच घेत असताना येथील वैद्यनाथ अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक पन्नालाल जैन यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या औरंगाबाद येथील पथकाने सोमवारी दुपारी परळीत अटक केली. बँकेच्या अध्यक्षांवरील कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबतची माहिती अशी की, 2018 मध्ये कॅश क्रेडीट ( सी .सी) खात्याचे अडीच कोटी रुपये कर्ज उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी व किराणा दुकानदार असलेल्या कर्जदारास मंजूर करण्यात आले होते. कर्ज मंजूर केल्याचा मोबदला म्हणून अशोक जैन याने कर्जदाराकडे 15 लाखाची मागणी केली होती. मात्र कर्जदाराने याची तक्रार लाच लुचपत विभागाकडे केली. लाचेच्या मागणीची पडताळणी दि. 29.09.2020 आणि दि. 10.10.2020 रोजी करण्यात आली. यातील 10 लाख रुपये स्वीकारून उर्वरित पाच लाख रुपये नंतर देण्याचे ठरले. यानंतर सोमवारी दुपारी शहरातील मोंढा येथील दुकानात दहा लाखाची लाच घेताना अशोक जैन यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या औरंगाबादच्या पथकाने ताब्यात घेतले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे औरंगाबादचे पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट, पोलीस नाईक विजय बाम्हंदे, सुनील पाटील, मिलिंद इप्पर, पोलीस शिपाई, विलास चव्हाण, चांगदेव बागुल यांनी सापळा रचून आरोपीस पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे औरंगाबाद पोलीस अधीक्षक डॉ राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.