- सोमनाथ खताळबीड : जिल्ह्यात रविवारी ‘डेल्टा प्लस’च्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. सोमवारी आरोग्य विभाग सर्वेक्षणाला गेल्यावर या रुग्णाचा महिन्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. स्वॅब दिल्यापासून तब्बल दोन महिन्यांनी उशिरा हा अहवाल प्राप्त झाला आहे. आता आरोग्य विभागाकडून रुग्ण राहत असलेल्या परिसरातील सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
बीड शहरातील अजिजपुरा येथील एक ७० वर्षीय रुग्ण ३ जून रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. ४ जून रोजी आरटीपीसीआर स्वॅब घेतल्यानंतर ५ जून रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सुरुवातीपासूनच या रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल ६४ होती. तसेच त्याला बायपॅपवर घेण्यात आले होते. चार दिवस बायपॅप लावल्यावर प्रकृती सुधारली. त्याला अगोदरच किडनी, डायबिटीज, हायपर टेंन्शन असे विविध आजार होते. किडनीचा आजार असल्याने डॉक्टरांनी त्याला डायलेसिस करण्याचा सल्ला दिला. यावर नातेवाइकांनी नकार दिल्याची नोंद आहे. पुढे २९ जून रोजी जावयाने स्वाक्षरी करत डॉक्टरांच्या सल्ल्याविरोधात जाऊन रुग्ण जिल्हा रुग्णालयातून बाहेर काढला. त्यानंतर ५ जुलै रोजी त्याचा घरीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ही सर्व माहिती सोमवारी आरोग्य विभागाकडून मिळाली. दरम्यान, रुग्णाची माहिती मिळताच आरोग्य विभागाकडून सकाळपासूनच सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. या परिसरातील ३४५ घरांचे तीन पथकांमार्फत सर्वेक्षण केले जात आहे. लक्षणे असणाऱ्यांचे समुपदेशन करून कोरोना चाचणी करण्याबाबत आवाहन केले जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट यांनी सांगितले.
मृत्यूचे कारण काय?कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाल्यापासून २८ दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास त्याची कोरोनात नोंद होत असल्याचे सांगण्यात आले. परंतु, याला ३० दिवस झाले होते. शिवाय डेल्टा प्लसचा अहवाल येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता हा मृत्यू नेमका कोरोनाने झाला की डेल्टामुळे? याबाबत आरोग्य विभाग वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत असल्याचे सांगण्यात आले.
सर्वेक्षण सुरू केले आहेजो रुग्ण डेल्टा प्लसचा होता, त्याचा महिन्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. संबंधित भागात सर्वेक्षण सुरू केले आहे. हा मृत्यू कशात नोंदवायचा? याबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेतले जाईल. याचा सर्व अहवालही तयार करण्यात आला आहे.- डॉ. रौफ शेख, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी बीड