बीड : कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी व गुन्हेगारांचा सुळसुळाट रोखण्यासाठी हद्दपारीच्या कारवाया केल्या जातात. याद्वारे गुन्हेगारांना विशेषाधिकार वापरून उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक विशिष्ट भागांत वास्तव्यास प्रतिबंध करू शकतात. मात्र, जिल्ह्यात हद्दपारीची कारवाई होऊनही काही गुन्हेगारांचा वावर 'हद्दी'तच असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यात चालू वर्षी हद्दपार केलेल्या आठ गुन्हेगारांनी आदेशाचे उल्लंघन केल्याची माहिती समोर आली आहे.
गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५, ५६ व ५७ नुसार हद्दपारीच्या कारवाया केल्या जातात. गुन्हेगारी टोळ्यांची पांगापांग करण्यासाठी कलम ५५ नुसार हद्दपारीचे आदेश काढले जातात, तर उपद्रवी लोकांवर कलम ५६ नुसार बडगा उगारला जातो. न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भाेगून आलेल्यांकडून पुन्हा गुन्ह्याचे कृत्य होऊ नये, यासाठी कलम ५७ नुसार हद्दपारीची नोटीस बजावली जाते. दरम्यान, जिल्ह्यात चालू वर्षी २२ जणांवर हद्दपारीच्या कारवाया करण्यात आल्या. गतवर्षी १७ जणांना हद्दपार केले होते. दरम्यान, तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी चालू वर्षी आठजण 'हद्दी'तच आढळले. पोलिसांनी त्या सर्वांवर कलम १४२ नुसार गुन्हा नोंदवून अटक केली. हद्दपारीच्या कारवाया करूनही गुन्हेगार हद्दीतच फिरत असल्याने कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या कारवाया जुजबी ठरण्याची भीतीदेखील व्यक्त केली जात आहे.
....
वर्षनिहाय हद्दपारीच्या कारवाया
२०१९ - ३५
२०२०- १७
२०२१- २२
.....
गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम
तीन महिन्यांपूर्वी गुन्हे शाखेने तडीपारीनंतरही त्या -त्या भागात वास्तव्यास असलेल्या गुन्हेगारांची धरपकड मोहीम राबवली होती. यानुसार गुन्हे शाखेने चार, तर पोलीस ठाणे स्तरावरून चार तडीपार आरोपींना पकडले होते. त्यांच्यावर गुन्हा नोंद करून जेरबंद करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
....
गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहिमा राबविण्याचे काम सुरूच आहे. हद्दपार केलेले गुन्हेगार हद्दीतच फिरत असतील तर त्यांना पकडून गुन्हे नोंद केले जातील.
- सतीश वाघ, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड
.....