माजलगाव : शहरातील स्वच्छतेसाठी नगरपालिका महिन्याला तब्बल १३ लाख रुपये खर्च करत असताना येथील नगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. गुत्तेदाराची मनमानी सुरू असताना नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष दिसत नसल्याने शहरात जागोजागी घाण दिसत आहे. नाल्यादेखील रोडवरून वाहत असल्याने शहरात जागोजागी दुर्गंधी पसरलेली दिसून येत आहे.
सहा महिन्यांपूर्वी येथील नगरपालिकेतील रोजंदारी कर्मचारी काम करत नसल्याने शहरात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे नगराध्यक्षा सुमनबाई मुंडे यांनी स्वच्छतेचे टेंडर काढून शहर स्वच्छतेचा निर्णय घेतला होता. शहरातील नाल्या सफाई करणे, कचरा उचलणे, शहरातील झाडझूड करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आदी या टेंडरमध्ये करण्यासाठी महिन्याकाठी नगरपालिकेला १३ लाख रुपये खर्च येतो. संबंधित गुत्तेदाराने सुरुवातीला २-३ महिने सुरळीतपणे काम केले. सध्या या ठेकेदाराने काही ठराविक ठिकाणच्या नाल्या स्वच्छ करणे सोडले तर शहरातील इतर भागातील नाल्या त्यांनी सुरुवातीला काढल्यानंतर पुन्हा त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.
यामुळे शहरातील गल्ली-बोळांमध्ये जागोजागी नाल्या तुंबल्या असून, या नाल्याचे पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत आहे. यामुळे जागोजागी दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. संबंधित गुत्तेदाराकडून ज्या ठिकाणी नाल्या काढण्यात आल्या आहेत, तो कचरा लवकर उचलला जात नसल्याने तोच कचरा पुन्हा नालीत जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. संबंधित गुत्तेदारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालिकेच्या कर्मचा-यांची व अभियंत्याची नियुक्ती केलेली असताना त्यांचेदेखील याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे संबंधित गुत्तेदार, पदाधिकारी व कर्मचा-यांत साटेलोटे झाल्याची चर्चा नगरपालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांतून ऐकायला मिळते.
मुख्याधिकाऱ्यांची मूकसंमती?
शहरात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरलेले असताना व नाल्या तुडुंब भरून वाहत असताना नगरपालिकेकडून संबंधित गुत्तेदाराला साधी विचारणाही
नगरपालिकेकडून केली जात नाही. सहा महिन्यांपासून येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी आलेले असताना ते शहरात कोठेही फिरून यावर लक्ष देताना दिसत नसल्यामुळे संबंधित गुत्तेदाराच्या मनमानी कारभाराला त्यांची मूकसंमती तर नाही ना, असे लोक बोलतात.
अभियंता म्हणतो, नाल्या लहान
नगरपालिकेचे स्वच्छता अभियंता जगदीश जाधवर यांना शहरातील शाहूनगर भागात असलेल्या मोठ्या नालीतून घाण पाणी रस्त्यावरून वाहत असल्याबाबत विचारणा केली असता, ते म्हणाले की, त्या भागातील नाल्या छोट्या असल्याने व नळाला पाणी आल्यानंतर या नालीमध्ये पाणी मावत असल्याने हे पाणी रस्त्यावरून वाहत असते.
===Photopath===
130521\img_20210510_095434_14.jpg~130521\img_20210415_103531_14.jpg