बीड : जिल्ह्यात जवळपास दहा वर्षांनंतर केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरड धान्य खरेदीचा प्रयोग यशस्वी झाला असून, पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळाला. तर केंद्र सरकाने मुदतवाढ दिल्यानंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुन्हा भरड धान्य ( ज्वारी, बाजरी व मका ) खरेदी सुरू करण्यात येत असून, नाफेडच्या वतीने खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने सहा खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी मिलिंद कापुरे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात भरड धान्य खरेदी ११ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आली होती; परंतु केंद्र शासनाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे १६ डिसेंबर रोजी बंद झाल्यामुळे खरेदी पोर्टल बंद करण्यात आले होते. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाकडून खरेदीस मुदतवाढ देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यासाठी उद्दिष्ट
मका १७ हजार ५१६ क्विंटल, बाजरी २९८७६ क्विंटल आणि ज्वारी २९ क्विंटलचे उद्दिष्ट मिळालेले आहे. जिल्ह्यातील सहा संस्थाना उद्दिष्ट विभागून देण्यात आलेले असून नियमावलीही देण्यात आली आहे. मेसेज पाठवण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या धान्याची प्राधान्याने खरेदी होईल. खरेदीसाठीचे उद्दिष्ट निश्चित केल्याने तेवढी खरेदी ३१ जानेवारीपूर्वी करण्यात येणार आहे. यापूर्वी ऑनलाइन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांस उद्दिष्ट शिल्लक असल्यास मेसेज देऊन खरेदी करिता बोलवण्यात येईल. यापूर्वी ऑनलाइन नोंदणी झालेल्यांचाच विचार होईल, नव्याने नोंदणी होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.
दहा वर्षांनंतर खरेदी
जिल्ह्यात दहा वर्षांनंतर शासकीय हमीदराने यंदा भरड खरेदी करण्यात आली. जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४०२ शेतकऱ्यांची ६ हजार ४१२ क्विंटल बाजरी खरेदी करण्यात आली होती. बाजरीला २१५० रुपये दर मिळाला, तर १७३ शेतकऱ्यांची १७५१ क्विंटल मका खरेदी करण्यात आली. दर १८५० रूपये क्विंटल होता. भरड धान्य खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार जिल्हा मार्केटिंग अधिकारी मिलिंद कापुरे यांनी आवश्यक पाठपुरावा व नियोजन करून पहिल्या टप्प्यात खरेदी यशस्वी केली होती.