वडवणी : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या रोहित्रांचे दरवाजे गायब आहेत. या उघड्या डीपींमधून विद्युत पुरवठा होत आहे. त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
झाडांची सर्रास कत्तल
वडवणी : वनविभागाचे वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृतीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. तोडलेली झाडे ट्रॅक्टरने वाहतूक करून नेली जात असताना कोणीही याकडे लक्ष देत नाही अथवा कारवाई करीत नाही. त्यामुळे पर्यावरणास एक प्रकारे हानी पोहोचत आहे. ऑक्सिजनसाठी वृक्षतोड थांबविणे गरजेचे असल्याचे मत वृक्षमित्र आण्णा महाराज दुटाळ यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज द्यावे
वडवणी : तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीसाठी बिनव्याजी ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग मस्के यांनी केली आहे.
अवकाळी, नैसर्गिक व कोरोनाच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आगामी खरिपातील पेरणीसाठी ३ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात यावे. त्याचबरोबर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये तत्काळ वाटप करण्यात यावेत, अशी मागणी मस्के यांनी केली आहे.
वाजंत्र्यांवर उपासमारीची वेळ
वडवणी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व राज्य सरकारने संचारबंदी घोषित केली आहे. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांसह विवाह सोहळे रद्द झाले आहेत. परिणामी, कमाईचे लग्न सराईचे चार महिने हातचे गेल्याने वाजंत्री कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाने या व्यावसायिकांना तातडीने मदत करावी, अशी मागणी बॅन्ड पथक मालक जाधव बबन यांनी केली आहे.
मुख्य रस्त्यावर शुकशुकाट
वडवणी
कोरोना संसर्गामुळे नागरिकांवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यातच संचारबंदीमुळे बससेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे बसस्थानकात येणे-जाणे बंद झाले आहे. खाजगी वाहनांची कसून चौकशी व तपासणी करून शहरात प्रवेश दिला जात आहे. यामुळे शहरातील बसस्थानक परिसरात व बाजारपेठेत तसेच मुख्य रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.