आष्टी : तरुणांसोबत बनावट विवाह करून चार-आठ दिवस राहून पैसे उकळणाऱ्या टोळीचा आष्टी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तालुक्यातील शिराळ येथील तरुणासोबत ९ मार्च रोजी विवाह करून दोन लाख रुपये न दिल्यास फसवून आणून बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी देत खंडणी वसूल करताना पोलिसांनी दोघांना पकडले. प्राथमिक चौकशीत यातील महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज आहे.
तालुक्यातील शिराळ येथील एका युवकाने आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्याचे एका महिलेसोबत लग्न झाले असून, आता ती महिला पैशाची मागणी करीत असून, पैसे न दिल्यास बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याची तक्रार होती. पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी या तक्रारीची शहानिशा करून तक्रारदाराने सांगितल्याप्रमाणे खात्री करण्यासाठी दोन शासकीय पंचांसह सापळा रचला. एक महिला व पुरुषाने मागणी केल्याप्रमाणे तक्रारदार युवकाकडून रोख रक्कम ५० हजार रुपये शासकीय पंचांसमक्ष स्वीकारत असताना पकडण्यात आले.
पोलिसांनी आरोपींची अधिक चौकशी केली असता, यापूर्वी ही महिला व पुरुषाने सात ते आठ युवक ज्यांचे जास्त वय किंवा लग्न नसलेल्या युवकांसोबत लग्न लावून नंतर खोट्या तक्रारी, धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी आष्टी ठाण्यात फसवणूक करून खंडणी मागितल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक आर राजा, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. सलीम चाऊस, पोउनि प्रमोद काळे, सफौ अरुण कांबळे, पोह बन्सी जायभाये, संतोष क्षीरसागर, पोशि प्रदीप पिंपळे, सचिन कोळेकर, स्वाती मुंडे, शिवप्रकाश तवले, रियाज पठाण यांनी ही कारवाई केली.
आणखी एकाला अटक, दोघांना कोठडी
अटक केलेल्या दोघांची नावे सोनाली गणेश काळे (२९, रा. लातूर) व अजय महारुद्र चवळे (२७, रा. खंडापूर, जि. लातूर) अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांना पाटोदा न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे; तर याप्रकरणी आणखी एक आरोपी रामा काशिनाथ बडे (रा. खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) याला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
आमिषाला बळी पडू नये
वय जास्त झालेल्या तरुणांना संपर्क करून लग्नाचे आमिष दाखवून या टोळीकडून आमच्याकडे मुलगी आहे, असे सांगून स्थळ दाखवले जाते व लग्नासाठी पैशांची मागणी करून वारंवार खंडणी वसूल केली जाते. अशा टोळ्यांपासून तरुणांनी सावध राहावे, अशी फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क करावा
- सलीम चाऊस, पोलीस निरीक्षक, आष्टी
===Photopath===
140321\img-20210314-wa0230_14.jpg
===Caption===
बनावट लग्न करून नंतर खंडणीची मागणी करीत तरूणांना फसविणाऱ्या दोघांना पकडून आष्टी पोलिसांनी कारवाई केली.