लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सहामध्ये ऑक्सिजनच्या हलगर्जीमुळे दाेन परिचारिकांची अगोदरच हकालपट्टी केली होती. आता चार दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राऊंडमध्ये एमबीबीएस डॉक्टर ड्युटीवर असतानाही गैरहजर होते. त्यामुळे त्यांनाही आता कार्यमुक्त करून रुग्णालयातून हकालपट्टीची कारवाई केली आहे. डॉ. शरद राऊत असे कारवाई झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.
लातूर विभागाचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन कोरोनाबाधित रुग्णांची माहिती घेतली. याचवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे देखील वॉर्डमध्ये आले. या दोघांमध्ये संभाषण सुरू असतानाच त्यांनी वॉर्ड क्रमांक सहामध्ये जाऊन दोषी यंत्रणेबद्दल खात्री केली. येथे त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची विचारणा केली असता कोणीच दिसले नाही. वारंवार संपर्क करूनही त्यांचा फोन बंद येत होता. वारंवार विचारणा करूनही अधिकाऱ्यांना उत्तरे देता येत नव्हते. यावेळी शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोडही उपस्थित होते. या सर्वांच्यासमोर हा प्रकार घडल्याने सीईओ कुंभार यांनी कर्तव्यावर गैरहजर असलेल्या डॉक्टरला तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे डॉ. राठोड यांनी त्याला कार्यमुक्त केले आहे. या कारवाईमुळे कामचुकार डॉक्टरांना चांगलाच दणका बसला आहे.
....
एका डॉक्टरकडे तीन वॉर्ड
कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात भरती केलेली आहे. परंतु, तरीही एकाच डॉक्टरकडे तीन वॉर्डची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. यावरूनही कुंभार चांगलेच संतापले होते. ड्युटी लावणारे वर्ग १ चे अधिकारी डॉ. आय. व्ही. शिंदे व रुग्णालय व्यवस्थापकाचे ढिसाळ नियोजन या निमित्ताने समोर आले आहे. एका वॉर्डसाठी एकाच डॉक्टरची नियुक्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
...
वेळेवर राऊंडही होत नाहीत
उपसंचालक डॉ. माले यांनी रुग्णांची कागदपत्रे तपासली. यात अनेक ठिकाणी डॉक्टरांच्या वेळेवर राऊंडच झालेला नसल्याचे दिसले. ड्युटी लिस्ट आणि झालेल्या तपासणीची यादीही फाईलला दिसली नाही. त्यामुळे उपसंचालकांनीही अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
--
प्रत्येक रुग्णाला वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळणे आवश्यक आहे. ढिसाळ नियोजनाबद्दल तक्रारी प्राप्त झाल्यानेच स्वत: राऊंड घेतला. यात अनेक त्रुटी आढळल्या. यात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या आहेत. वारंवार त्याच चुका दिसत असल्याने आता याचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे.
- डॉ. एकनाथ माले, उपसंचालक, लातूर.
---
वॉर्ड क्रमांक सहामधील एमबीबीएस असलेले डॉ. शरद राऊत यांना कार्यमुक्त केले आहे. तसेच ड्युटी लावणाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
-डॉ. सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.