अंबाजोगाई -: मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून एका तरुणाने स्वत: च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आज सकाळी ११ वाजता आत्महत्या केली. आकाश काकासाहेब जाधव (वय -२५, रा. तडोळा,ता.अंबाजोगाई) असे मृताचे नाव आहे.
आकाश जाधव हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रिय होता. समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून आकाश जाधव याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. शेतात जाणाऱ्या ग्रामस्थांना त्याचे प्रेत शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेले दिसले. यानंतर ही वार्ता गावभर पसरली. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती बर्दापूर पोलीस ठाण्याला कळवली. पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली.व प्रेत पंचनामा करून शव विच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवले. तिथे रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. आकाश जाधव यांच्या पश्चात वृध्द आई -वडील, भवजई व एक छोटा पुतण्या आहे.
मोठ्या भावाने ही दीड वर्षापूर्वी केली होती आत्महत्या -: मयत आकाश जाधव यांच्या भावाने दीड वर्षापूर्वी शेती पिकत नसल्याने आलेल्याआलेल्या नैराश्यातून आत्महत्या केली होती. त्यामुळे हे कुटुंब दुःखातून सावरलेले नसतानाच लहान भाऊ असलेल्या आकाश याने ही आत्महत्या केल्याने कुटुंबाचा आधार गमावल्याने हे कुटुंब संकटात सापडले आहे.
मराठा आरक्षणासाठी अंबाजोगाई तालुक्यातील दुसरी आत्महत्या -:मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ऑक्टोबर महिन्यात अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील शत्रुघ्न अनुरथ काशीद ( वय-४२)यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा आरक्षणाच्या घोषणा देत टाकीवरून उडी मारत आत्महत्या केली होती.त्यानंतर आज आकाश ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने तालुक्यात आरक्षणासाठी दोन आत्महत्या झाल्या आहेत.