अंबाजोगाई : आम्ही सांगितल्याप्रमाणे शेताची मोजणी का करत नाहीत असा जाब विचारात शेतक-याने भूमी अभिलेख अधीक्षकास चक्क चाबकाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी अंबाजोगाई बसस्थानकावर घडली. याप्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अंबाजोगाई येथील भूमी अभिलेखमधील कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब दगडू गरकळ हे नेहमीप्रमाणे आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास बीडहून आलेल्या बसमधून अंबाजोगाई बस स्थानकावर उतरले आणि कार्यालयाकडे जाऊ लागले. यावेळी आरोपी रामधन दादाराव केंद्रे (रा. होळ, ता. केज) या शेतकऱ्याने त्यांना रस्त्यात अडविले आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे आमच्या शेताची मोजणी का केली नाही असा जाब विचारला.
यावर बाबासाहेब गरकळ यांनी न्यायालयाने दिलेल्या चतुःसीमे प्रमाणे तुमची मोजणी होऊ शकत नाही. मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या समक्ष तुमच्या शेताची पाहणी केली आहे, आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे मोजणी करू शकत नाही असे सांगितले. याचा राग मनात धरून आरोपी रामधन केंद्रे यांनी गरकळ यांना बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर अडवून शिवीगाळ करत चाबकाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तू इथे कशी काय नोकरी करतोस ते बघतो अशी धमकी दिली असे गरकळ यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सदर तक्रारीवरून रामधन केंद्रे याच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलम ३५३, ३४२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहा. फौजदार बोडखे हे करत आहेत. दरम्यान, सहा महिन्यापूर्वीच अंबाजोगाई येथील भूमि अभिलेख कार्यालयाचे प्रभारी उपअधिक्षक गोरखनाथ जाधव यांना राडी येथील शेतकरी मधुकर राजाराम पांडे याने मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आजही एका कर्मचाऱ्यास चाबकाने मारहाण करण्याचा प्रकार झाल्याने कर्मचाऱ्यात संतप्त वातावरण असून कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.