ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १५ - वडवणी तालुक्यातील लक्ष्मीपूर आणि वस्ती परिसरातील नागरिकांना जाण्यासाठी रस्ता नाही. पावसामुळे जवळच असलेल्या नदीला पाणी आले असून यातून मार्ग काढण्यासाठी नागरिक, शेतकरी विद्यार्थी यांना होडीच्या साहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
वडवणी तालुक्यात यावर्षी जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील तलाव, नदी, नाले, ओढे, प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. परंतु या पाण्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. वडवणी शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कान्हापुर-लक्ष्मीपुर गावाच्या मधून जाणा-या नदीला सध्या पुर आलेला आहे.
त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. या नदीवरून पुल बांधण्याची अनेकवेळा मागणी करण्यात आली, परंतु याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या नदीवर पुल करून ग्रामस्थ व शेतक-यांचे हाल थांबवावेत, अशी मागणी अंकुश सवासे आशोक सवासे विठ्ठल सवासे दत्ता सवासे कृष्षा खताळ व परिसरातील नागरिकांमधून होत आहे.