बीड : तालुक्यातील सिरस पारगावमध्ये बनावट दारू बनविणाऱ्या कारखान्याचा विशेष पथकाने पर्दाफाश केला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी बीड ग्रामीण ठाण्याचे जमादार व पारगावचे बीट अंमलदार भारत जायभाये यांना तडकाफडकी निलंबीत केले. तर सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांची चौकशी लावली आहे.पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी सकाळी सिरस पारगाव येथे छापा टाकून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले होते. तसेच त्यांच्याकडून दारूसह विविध साहित्य असा साडे चार लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, अधीक्षक जी.श्रीधर यांनी याची गंभीर दखल घेत ठाणेदारांच्या कर्तव्यावर नाराजी व्यक्त केली. तर बीट अंमलदार भारत जायभाये यांना तडकाफडकी निलंबीत केले. तसेच सपोनि बल्लाळ यांची गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जून भोसले यांच्याकडे प्राथमिक चौकशी दिली आहे.दारू बंदीचा नुसताच बोभाटा...बीड ग्रामीण ठाण्यात दारू बंदीचा नुसताच बोभाटा केला जात असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र दारू विक्री तर होतेच परंतु बनावट दारूही तयार केली जात असल्याचे कारवाईने समोर आले आहे. त्यामुळे बीड ग्रामीण ठाण्याच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात असून अधीक्षक जी.श्रीधर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.ठाणेदारांची पथकावर नाराजीगोपनीय माहिती काढून धडाकेबाज कारवाया केल्यानंतर अधीक्षकांकडून ठाणेदारांची कानउघडणी केली जाते. ठाण्याच्या हद्दीत जावून टिच्चून कारवाया केल्या जात असल्याने पथकातील अधिकारी, कर्मचाºयांवर नाराजी व्यक्त होत आहे. ठाणेदार केवळ नाराज होत आहेत, प्रत्यक्षात कारवाया करण्यास मात्र आखडता हात घेत असल्याचे वारंवार समोर येत आहे. सर्वसमान्य जनता मात्र पथकाच्या कारवायांवर समाधानी असल्याचे समजते.
बनावट दारू प्रकरण; बीट अंमलदार निलंबित तर ठाणेदारांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 12:09 AM