कडा (जि. बीड) : तुम्हाला घरकुल मंजूर झाल्याची बतावणी करुन दुचाकीवर आलेल्या तोतया अधिकाऱ्याने दोन तोळे सोन्याचे दागिने घेऊन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.
आष्टी तालुक्यातील कडा येथील सुंदरनगर येथे राहत असलेले फिरोज नूरखा पठाण यांच्या घरी रविवारी सायंकाळी एक तोतया अधिकारी म्हणून अनोळखी व्यक्ती आला. घरात फिरोजखान यांच्या आई, पत्नी होते. सदर इसमाने त्यांना, ‘तुम्हाला घरकुल मंजूर झाले असून तीन लाख रु पयांचा चेक घेऊन आलो आहे. मला दहा हजार रु पये रोख द्या, अशी मागणी केली. रोख नसल्याचे दोघींनी सांगितले. त्यावर सोने मोडा आणि पैसे दिले नाहीतर तर चेक परत जाईल, असे या इसमाने सांगितले.
पैशांची व दागिन्यांची शोधाशोध करण्यासाठी गडबड करीत आग्रह धरला. अखेर नगदी रक्कम नसल्याने घरातील गळसर व गंठण असे दोन तोळे सोन्याचे दागिने घेऊन हा इसम पसार झाला. हा तोतया अधिकारी विनाक्रमांक असलेल्या दुचाकीवरून पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे आई, व पत्नी यांनी फिरोजला बोलावून सांगितले. सदर प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अद्याप कसलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.