बीड : आयात शुल्कात कपात केल्याने तीन-चार दिवसांपासून खाद्यतेलाच्या ठोक आणि किरकोळ दरात घसरण झाली आहे. खाद्यतेलाचे भाव लिटरमागे सात ते १४ रुपयांनी उतरले आहेत. कमी झालेले दर आगामी सणासुदीच्या काळात व नंतर टिकून राहतील का, असा प्रश्न आता सामान्य ग्राहक विचारत आहे.
मागील वर्षी दिवाळीपासून खाद्यतेलाच्या दरात कमालीची वाढ झाली. सूर्यफूल तेल ५० तर सोयाबीन तेलाच्या दरात ४० टक्के वाढ झाली होती. पाम तेलही शंभरी ओलांडून १४० पर्यंत पोहोचले होते. मागणी कमी असताना शेंगदाणा, मोहरी आणि तीळ तेलाचे दर चढेच राहिले. खाद्य तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले. भाजीला फोडणी कशी द्यायची, असा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबापुढे होता. मध्यंतरी दर काहीसे कमी झाले. ही कपात काही दिवसांपूर्वीच क्षणिक राहिली. त्यानंतरही तेलाचा भडका सुरूच होता. मागील आठवड्यात केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात केल्याने बाजारात तेलाच्या दरात लिटरमागे सात ते चौदा रुपयांपर्यंत घसरण झाली. तेल स्वस्त झाले, इतर वस्तुंचे भाव कमी होतील का? असा प्रश्न सामान्य कुटुंबातील गृहिणी विचारत आहेत.
---------
आठवड्याआधीचे दर -- २२ सप्टेंबरचे दर (प्रति लिटरमध्ये)
१७५ -- सूर्यफूल तेल - १६३
१६० -- सोयाबीन तेल - १४८
१४० -- पामतेल - १२६
१७० -- शेंगदाणा तेल -१६०
१९० -- मोहरी तेल - १९०
२०० -- तिळाचे तेल - २१०
फारसा फरक पडणार नाही
तेलाचे भाव कमी झाल्याच विक्रीवर फार फरक पडणार नाही. जेवढे प्रमाणानुसार ग्राहकाला लागते तेवढे तो खरेदी करणारच आहे. लिटरमागे त्याला सात ते चौदा रुपयांपर्यंत कमी पैसे मोजावे लागतील मात्र उठाव होता तेवढाच राहणार आहे. - गंगाबिशन करवा, होलसेल किराणा व्यापारी
----------
खाद्य तेलाचे भाव दहा-बारा रुपयांनी कमी झाले आहेत. वाढत्या महागाईत हा दिलासा असला तरी इतर वस्तुंचे भाव वाढतच आहेत. तेलाचे भाव नियंत्रणात कसे राहतील आणि ते आणखी कमी कसे होईल यावर शासनाने उपाय करण्याची गरज आहे. - प्रशांत मोकाशे, ग्राहक, बीड
------------
चालू आठवड्यात खाद्य तेलाचे भाव लिटरमागे आठ ते दहा रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. दर फार कमी झाले, असे नाही. सध्या तेलाचे कमी झालेले दर पाहता आगामी सिजनच्या काळात ग्राहकी चांगली होईल, विक्रीतही वाढ होण्याची अपेक्षा आहे. -- रामेश्वर देशमाने, व्यापारी