माजलगाव - माजलगाव येथून आखाती देशात गेलेले निवृत्त शिक्षक खैरूल्ला खान व कुटुंबीय तेथे झालेल्या ढगफुटीत बेपत्ता झाले असून शनिवारी (18 मे) ही घटना घडली.
खैरउल्ला खान सत्तार खान (52) हे माजलगाव येथील बुखारी शाळेतील माजी शिक्षक आहेत. खान आपल्या पत्नीसह ओमान देशात मस्कत येथे आय बी अल हैथम मेडिकल सेंटर येथे नोकरीस असलेला मुलगा सरदार खान यास भेटण्यासाठी 6 मे रोजी माजलगाव येथून गेले होते. शनिवारी ते आपला मुलगा सरदार, सून व तीन नातवंडे, चार वर्षीय मुलगी, दोन वर्षे मुलगा, 22 दिवसांचा एक मुलगा अशी सर्व मिळून एका कारमध्ये पर्यटन स्थळ असलेल्या ‘वादी बीन खालिद’ येथे जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वादळी वारे सुटले व ढगफुटी झाली.
परिस्थिती पाहण्यासाठी त्यांचा मुलगा कारमधून बाहेर आला मात्र अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि यात कार वाहून गेली. कारमध्ये असलेली खान व त्यांची पत्नी ,सून नातवंडे यांचा शोध स्थानिक प्रशासन घेत आहे. खैरूला खान सतार खान (52), शबाना खान खैरूला खान (48), सून अरशी खान सरदार खान (28) , नात शिदरा (4), नातु जहेद (2) व नु (22 दिवस) अशी त्यांची नावं आहेत. खाली उतरलेला सरदार एका झाडाला धरून राहिल्याने तो या दुर्घटनेतून बचावला आहे. काही क्षणातच जोरदार धुके पसरून मोठा पाऊस झाला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होऊन हा परिसर जलमय झाला. या घटनेमुळे माजलगावात शोककळा पसरली आहे.