विजयकुमार गाडेकर
शिरूर कासार : तालुक्यातील वारणी येथील रहिवासी असलेले डॉ. अनिल बडे यांचे संपूर्ण कुटूंब कोरोना बाधित झाले होते. यात ७१ वर्षीय आजोबांचा देखील समावेश होता. परंतु या सर्वांनी न घाबरता वेळेच्या वेळी औषधोपचारांसह ,व्यायाम ,काढा ,
आहाराबाबत वेळेचे भान ठेवून नियमावलीचे तंतोतंत पालन केल्याने सर्व सदस्यांनी कोरोनावर मात केली. कोरोना हा महाभयंकर असला तरी त्याला सुद्धा हरवता येते, हे बडे कुटुंबानी सिद्ध करून दाखवले.
डॉ. अनिल बडे व डॉ. प्रिती बडे हे दोघेही शिरूर येथे वैद्यकीय क्षेत्रात सेवा देत आहेत. त्यांच्या कुटुंबात वडील संपतराव बडे यांच्यासह तेरा सदस्यांचा मोठा परिवार आहे. डॉ. अनिल बडे यांना हलकासा ताप आल्याची जाणीव होताच ते विलगीकरणात गेले. तपासणी अंती कोरोना बाधित ठरले. पाठोपाठ वडील ,पत्नी असे दहा सदस्य कोरोना संक्रमित झाले. फक्त वडील संपतराव बडे यांना बीडला उपचारासाठी नेले. त्यांना मधुमेह, रक्तदाबाचा आजार असताना सुध्दा सकारात्मक विचारातून न घाबरता कोरोनावर मात केली. इतर सर्व सदस्य घरीच राहून डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घेऊन ठणठणीत झाले. शासनाचा चौदा दिवसांचा विलगीकरणाचा नियम ओलांडून हे कुटुंब तब्बल २१ दिवस घरातच थांबून राहिले. कोरोनावरील मोजकी औषधी घेत सर्वांनी सूर्यप्रकाश, योगा ,प्राणायाम ,वाफ घेणे ,हळदपाणी गुळण्या करणे ,आहार वेळेवर व पुरेसा घेणे तसेच आराम या गोष्टिंवर लक्ष केंद्रित केले होते. योग्य उपचार व नियमांचे तंतोतंत पालन केल्याने बडे कुटुंबांनी कोरोनावर मात तर केलीच परंतु पुन्हा सेवेत हजर झाले.
अन्य व्याधी असतांना कोरोना झाला. परंतु न घाबरता धैर्याने सामोरे गेलो. घरातील सर्वांना धीर दिला. उपचारासाठी बीडला डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे राहिलो. न घाबरता काळजी घेतल्यास कोरोनावर मात करता येते हे सिध्द झाले. सध्या रूग्ण संख्येत होणारी वाढ व त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने नियमात राहिल्यास आपणास कोरोना मुक्त होण्यास वेळ लागणार नाही. - संपतराव बडे.
सात महिन्यापूर्वी आमच्या आजीचे निधन झाले होते. नियमांची फारशी सक्ती नव्हती. परंतु त्यावेळीही आम्ही होणारी गर्दी टाळण्यासाठी अवघ्या दोन तासात अंत्यविधी केला होता. आणखी काळजी घेण्याची गरज आहे. - डॉ. अनिल बडे.
आमचे सासरे संपतराव बडे ,पती डॉ. अनिल बडे, माझ्यासह घरातील दहा सदस्यांना कोरोनाची बाधा झाली होती. परंतु सकारात्मक विचार आणि सोबतीला धैर्य होते. वैद्यकीय क्षेत्रातील तसेच इतरांनी विचारपूस करून आधार दिल्याने ऊर्जा मिळाली व आमच्या कुटुंबाने कोरोनाला हरवले. तेव्हा सर्वांनी काळजी घेत ,नियमांचे पालन केल्यास कोरोना फार काळ थांबणार नाही. - डॉ. प्रिती बडे
===Photopath===
300421\30bed_1_30042021_14.jpg