परळी (बीड) : येथील जेष्ठ कीर्तनकार, तथा जागतिक कीर्तीचे मृदंगाचार्य , मृदंगमहर्षी ज्ञानोबा माऊली लटपटे कोद्रीकर यांचे गुरुवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी १० वाजता परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. डॉ. निळकंठ लटपटे व कीर्तनकार बाळासाहेब महाराज लटपटे यांचे ते वडील होत.
ज्ञानोबा महाराज लटपटे यांचे मूळ गाव कोदरी ( तालुका गंगाखेड जिल्हा परभणी ) हे आहे. त्यांनी पंढरपूर, आळंदी या ठिकाणी राहून वेदशास्त्र पुराण यांचा अभ्यास व मृदंगाचे ज्ञान आत्मसात केले होते. देशभरात महाराजांनी आपल्या कलेची छाप सोडली आहे. महाराजांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाची फार मोठी हानी झाली आहे. परळी पंचक्रोशीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व जेष्ठ नामांकित कीर्तनकार आणि सर्व तरुणांचे मार्गदर्शक म्हणून महाराजांकडे पाहिले जात होते.
महाराजांनी चांदापूर रोड परळी येथे मातोश्री चंद्रभागा आश्रमाची निर्मिती केली आहे. येथे हजारो शिष्यांना मृदंग कलेमध्ये प्राविण्य मिळवून देत त्यांनी कीर्तनकार तयार केले. द्रुपद -धमार, शास्त्रीय- उपशास्त्रीय, सर्वच प्रकारच्या जागतिक गायकांना त्यांनी मृदंगाची साथ केलेली आहे. वारकरी संप्रदाय कीर्तन परंपरेमध्ये महाराजांनी प्रतिभावंत मृदंग वादक म्हणून महाराष्ट्रामध्ये एक काळ गाजवलेला होता. धुंडा महाराज देगलूरकर, पूज्य मामासाहेब दांडेकर, कंधारकर महाराज, रामकृष्ण महाराज केंद्रे, देहूकर फड, वासकर फड ,सद्गुरु जोग महाराज फड, आळंदी देहू पंढरपूर संस्थाने , अशा सर्व ठिकाणी महाराजांनी आपल्या मृदंग वादनाची छाप सोडलेली होती.
महाराज सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी तथा, देहूकर फडाचे पाईक होते. देहूकर फडपरंपरेमधील ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून महाराजांचा नावलौकिक होता. श्री गुरु रामकृष्ण महाराज केंद्रे प्रेरित गीता भवन ट्रस्टचे जवळजवळ पंधरा वर्षे अध्यक्ष होते. श्री गीता भवनच्या स्थापनेपासून ते आजतागायत महाराज विश्वस्त म्हणून काम करत होते. मागच्या मे महिन्यामध्ये महाराजांच्या मार्गदर्शनात गीताभवनचा सुवर्ण महोत्सव अतिशय भव्य दिव्य स्वरूपात पार पडला होता.