- नितीन कांबळेकडा (जि. बीड) : वय साडेचार वर्षे. वजन १२०० किलो. नाव सोन्या. देखभालीसाठी तीन गडी. खायला दोन किलो भरडा, चार डझन केळी, शंभर एमएल करडई तेल, मक्याचे कणीस, वैरण. रोज अर्धा तास फेरफटका. दररोज अंघोळ. दिसायला आडदांड असलेल्या 'सोन्या' बैलाचा राज्यासह परराज्यांत मोठा बोलबाला आहे. येथील कृषी प्रदर्शनात आकर्षण ठरत असलेल्या सोन्याने दोन वर्षांत मालकाला ३० लाख रुपये कमवून दिले आहेत.
उंबराणी (ता. जत, जि. सांगली) येथील विद्यानंद चन्नापा आवटी यांनी दोन वर्षांपूर्वी साडेचार लाख रुपयांना खिलार जातीचा बैल घेतला होता. त्याचा लेकराप्रमाणे सांभाळ केला. हा सोन्या आता साडेचार वर्षांचा झाला आहे. त्याने आजवर कर्नाटकात चार ठिकाणी कृषी प्रदर्शनांत सहभाग घेतला. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सोलापूर, कऱ्हाड, इंदापूर, सातारा, पुणे, विजापूर, आष्टी यांसह अनेक ठिकाणी कृषी प्रदर्शनात हजेरी लावत मुख्य आकर्षण ठरला आहे. सोन्याला सकाळी अर्धा तास फेरफटका मारावा लागतो. नंतर अंघोळ आणि मग दोन किलो भरडा, चार डझन केळी, १०० एमएल करडई तेल, मक्याची कणसे, वैरण असा दिवसभराचा आहार होतो. दोन वर्षांत त्याने ३० लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळवून दिले असून त्याने आर्थिक घडी बसवली आहे. त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.
नैसर्गिक रेतनासाठी होतो वापरकृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असलेला सोन्याला कृषी प्रदर्शनातच नाही, तर खिलार गाईचे नैसर्गिक रेतन करण्यासाठी देखील त्याचा वापर होत आहे. यातूनदेखील चांगला पैसा मिळत आहे.
साडेचार लाखांचा सोन्या मागितला होता ४१ लाखांनासाडेचार लाखांना घेतलेला सोन्या काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी ४१ लाख रुपयांना मागितला होता; पण मालकाने त्याला विकले नाही. ४१ लाख नव्हे ४१ कोटींना मागितला तरी आपण त्याला विकणार नसल्याचे मालक विद्यानंद आवटी यानी सांगितले. तसेच पोटच्या लेकरासारखा त्याला मी सांभाळला आहे. आजवर लाखो लोकांनी त्याला पाहिले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्याला विकणार नसल्याचेदेखील आवटी यांनी सांगितले.