धारूर : तालुक्यातील असोला येथे महिलांसाठी आतापर्यंत शेतीशाळेचे पाच वर्ग पूर्ण करण्यात आले असून विविध शेतीतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
असोला येथे खरीप हंगामाच्या सुरुवातीला जूनपासून सेंद्रिय शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या आत्माचे बीडचे प्रकल्प संचालक डी.जी. मुळे व तालुका कृषी अधिकारी एस.डी. शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आजतागायत एकूण पाच वर्ग झाले आहेत. आजपर्यंत जैविक बीजप्रक्रिया, अंडा अमिनो ॲसिड, दशपर्णी अर्क, जैविक बुरशीनाशके, जैविक कीटकनाशक अशा विविध निविष्ठा प्रत्येक वर्गात प्रत्यक्ष बनवून दाखवण्यात आल्या. त्याचा प्रत्यक्ष वापर शेतीशाळेत निवड झालेल्या महिला आपल्या शेतात करत आहेत. सेंद्रिय पद्धतीने अल्प खर्चातदेखील या निविष्ठा कशा प्रकारे वापरता येतात, या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. आत्मा विभागाचे ज्ञानेश्वर धस, संतोष देशमुख तसेच कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी, शेतीतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. संपर्क शेतकरी तथा जिल्हा शेतकरी समितीच्या सदस्या सविता बोबडे व इतर महिला शेतकरी शेतीशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
250921\img-20210925-wa0084.jpg
आसोला येथील शेतीशाळा