बीड : कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून जीवनयात्रा संपविली. ही घटना शिरूरकासार तालुक्यातील विघनवाडी येथे घडली. जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत याची नोंद करण्यात आली आहे.
नाना रोहिदास कोकाटे (३५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कोकाटे यांना चार एकर शेत जमीन आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शेतीसाठी स्टेट बँक आॅफ इंडियाकडून एक लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. दुष्काळामुळे शेतीत काही पिकले नाही, त्यामुळे ते नैराश्यात होते. यातूनच त्यांनी १३ मे रोजी सायंकाळी शेतात जावून विषारी द्रव प्राशन केले. हा प्रकार समजताच तातडीने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भाऊ सयाजी रोहिदास कोकाटे यांच्या माहितीवरुन रुग्णालय चौकीत नोंद करण्यात आली. नाना कोकाटे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.