लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : जमिनीचा ताबा देण्याबाबत उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याचा आदेश पोलिस व मंडळ अधिकारी यांना शेतकऱ्यांनी दाखविला. परंतु याची कसलीही दखल न घेतल्याने हत्बल झालेल्या अन्यायग्रस्त शेतकऱ्याने पोलिस, अधिकाऱ्यांसमोर गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तहसीलदारांच्या आदेशाने हा ताबा देण्याची कार्यवाही थांबविण्यात आली. परंतु न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या पोलिस व महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
बीड शहरापासून अवघ्या काही अंतरावर सर्व्हे नंबर ८४ बीड बोबडे तरफमधील जमिनीचा ताबा देण्यासाठी महसूल व पोलिस गेले होते. परंतु शरद क्षीरसागर (६०) व इतर शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत या ताबा देण्याच्या कार्यवाही विरोधात स्थगिती आणली.
स्थगिती असतानाही ताबा
न्यायालयाचा हा आदेश शेतकऱ्यांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनाही पाठविला. तहसील कार्यालयातही नेऊन दिला. परंतु तरीही मंडळ अधिकारी सचिन सानप व पोलिसांनी जमिनीचा ताबा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे शरद क्षीरसागर यांनी बाजूलाच असलेल्या घरात जाऊन दोरीने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत त्यांना थांबवले.
जमिनीचा ताबा देण्यासाठी पोलिस व महसूल कर्मचारी गेले होते. परंतु न्यायालयाचा आदेश पाहताच सर्वांना पत्र व फोनद्वारे कळवून कार्यवाही थांबविण्यास सांगितले. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले असून, त्याप्रमाणेच कार्यवाही करणार आहोत. - सुहास हजारे, तहसीलदार, बीड