बीड/औंढा नागनाथ/सेनगाव (जि.हिंगोली) : मराठवाड्यातील बीड व हिंगोली जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे मंगळवारी समोर आले. गेल्या चार दिवसांचा विचार केला तर आत्महत्यांचा हा आकडा आता १२ वर पोहोचला आहे.
बीड जिल्ह्यातील आम्ला वाहेगाव (ता. गेवराई) येथील शेतकरी रामनारायण खेत्रे (४२) यांनी बँकेचे कर्ज व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्ज माफ न झाल्यामुळे ते चिंतेत होते. त्यातच अतिवृष्टीने उरल्या-सुरल्या अपेक्षाही भंगल्या यामुळे त्यांनी रविवारी आत्महत्या केली. तलवाडा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक माने हे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथील शेतकरी अरुण मारोती शिंदे (३०) यांनी २६ आॅक्टोबर रोजी विषारी द्रव प्राशन केले होते. मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोसायटीचे कर्ज फेडण्याची चिंता असतानाच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने नैराश्यातून त्यांनी जीवन संपविले.
तिसऱ्या घटनेत हिंगोली जिल्ह्यातील वाळकी (ता. औंढा नागनाथ) येथील शेतकरी संभाजी लक्ष्मण मुकाडे (६५) यांनी कर्ज परतफेड न करता आल्याने शेतातील जांबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर खाजगी बँकांचेही कर्ज होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मुकाडे यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.
चौथ्या घटनेत केलसूला (ता. सेनगाव, जि. हिंगोली) येथील अल्पभूधारक शेतकरी संजय पिराजी चव्हाण (३५) यांनी कर्ज फेडायच्या विवंचनेत गळफास घेऊन आत्महत्या केली. १२ नोव्हेंबर रोजी हा प्रकार समोर आला. अतिवृष्टीने शेतीतील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे त्यांनी आत्महत्या केली. चव्हाण यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.
शेतकरी फार मोठ्या आर्थिक अरिष्ट्यात सापडले असून अतिवृष्टीपासून दिवसेंदिवस आत्महत्यांचे सत्र वेगाने सुरू झाले आहे. सुरुवातीला पडलेल्या रिमझिम पावसावर कशीतरी जगविलेली पिके पुर्णपणे पाण्यात गेली असून हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली असून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य वाढले आहे.