केज (बीड ) : केज तालुक्यातील जानेगाव येथे एका ४७ वर्षीय महिलेने दुष्काळी परिस्थिती आणि नापिकीला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. सिंधुबाई सुभाष शिंदे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
जानेगाव येथील सिंधुबाई शिंदे यांच्या कुटुंबात अडीच एकर जमीन आहे. १० वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे आजाराने निधन झाले. यानंतर सिंधुबाई यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत दोन मुली आणि एका मुलाला लहानाचे मोठे केले. शेतजमिनीतून मिळालेल्या उत्पनांतून त्यांनी आतापर्यंत गुजराण करून मुली, मुलाचे लग्न केले. मात्र, मागील काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती पाठ सोडत नसल्याने शेती नापीक बनली होती. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने त्या खचल्या होत्या. यंदा ही पाऊसकाळ नसल्याने पिके सुकल्याने त्या चिंताग्रस्त बनल्या होत्या. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी टोकाची भूमिका घेतली.
गुरुवारी सकाळी शेतातून येते असे सांगून त्या शेतात गेल्या. त्यांच्या शेतालगत असलेल्या चुलत सासरे सुग्रीव विश्वनाथ शिंदे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन सिंधुबाई सुभाष शिंदे यांनी आत्महत्या केली. अशी खबर त्यांचा मुलगा दयानंद सुभाष शिंदे यांनी युसुफवडगाव पोलिसात दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.