लोकमत न्यूज नेटवर्ककेज : मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्याच्या मागणीसाठी धरण परिसरातील पंधरा गावच्या शेतकºयांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मांजरा धरणाच्या उजव्या कालव्यात सोडण्यात आलेल्या वाहत्या गळ्यापर्यंत खोल पाण्यात उतरत पाच तास जलसमाधी आंदोलन केले.
शेतकरी जलसमाधी आंदोलन मागे घेत नसल्याचे पाहून अखेर सायंकाळी मांजरा प्रकल्पाच्या अभियंत्यांनी शेतकºयांच्या आंदोलनापुढे नमते घेत मांजरा धरणातून उजव्या कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद केले. तसेच धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार नाही व मांजरा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील शेतकºयांच्या विद्युत पंपाचा वीजपुरवठा मांजरा धरणातील मृत साठ्यापर्यंत पाण्याचा उपसा होईपर्यंत बंद करण्यात येणार नाही असे मांजरा धरणाचे प्रभारी उप अभियंता माखणे यांनी मुकूंद कणसे, उमाकांत भुसारे, सतीश शिंदे , काशिनाथ भिसे, प्रताप सोमवंशी, बब्रुवान कणसे यांच्यासह शेतकºयांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच सदरील आंदोलन मागे घेतले.
यावेळी नायब तहसीलदार गेंदले, युसुफ वडगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, सपोनि मांजराचे शाखा अभियंता शहाजी पाटील उपस्थित होते. यावेळी मांजरा धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.