लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : साखर सहसंचालकांनी लेखी पत्राद्वारे आदेशित करूनही जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे व्यवस्थापक बैठकीला हजर न राहिल्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने दिनांक १ जानेवारी रोजी औरंगाबाद येथील सहसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. जिल्ह्यातील कारखाने स्थानिक व कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा नोंदीत ऊस आणण्याऐवजी शेजारच्या जिल्ह्यातून ऊस आणत आहेत. त्यामुळे स्थानिक ऊस उत्पादक अडचणीत आले आहेत. याविरोधात शेतकरी संघर्ष समितीने गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली बीड व परभणी जिल्ह्यांच्या सीमेवर आंदोलन केले होते. त्यावेळी कारखान्यांनी गेटकेन ऊस बंद करून कार्यक्षेत्रातील ऊस घेण्याची हमी दिली होती. मात्र, या दिलेल्या हमीचे पालन झाले नाही. त्यामुळे थावरे यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर सहसंचालकांनी २९ डिसेंबर रोजी बैठक बोलावून सातही साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, लेखी पत्र दिलेले असतानाही एकही व्यवस्थापक बैठकीला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला होता. याप्रकरणी प्रशासनाने कारखान्यांविरूद्ध कोणतीही कारवाई केली नाही. प्रशासनाच्या उदासिन भूमिकेविरोधात दिनांक १ जानेवारी रोजी औरंगाबाद येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सहसंचालकांशी चर्चा करण्यात आली. तसेच प्रश्न निकाली न काढल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे थावरे म्हणाले.