- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : गंभीर कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्याने ज्या ठिकाणी ऑक्सिजन वापरण्यात येतो तेथील सिलेंडर साठा शासनाने ताब्यात घेतला आहे. याचा परिणाम ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीवर झाल्याचे दिसून येत आहे. वेळेत ट्रान्सफॉर्मर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत असून संबंधीत कार्यालयात खेटे मारण्याची वेळ आली आहे. ट्रान्सफॉर्मर अभावी शेतातील पिके संकटात आली असून तीव्र उन्हाने करपण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यामुळे आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. गंभीर कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये यासाठी राज्य सरकार हॉस्पिटल सोडून ज्या ठिकाणी आँक्सीजनचा वापर होतो तेथील सर्व सिलेंडर साठा ताब्यात घेत आहे. साखर कारखाने , दुकाने, ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीचे वर्कशॉप आदी ठिकाणांवरून ऑक्सिजन सिलेंडर साठा महसूल विभागाच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आला आहे. यामुळे साखर कारखाने, वर्कशॉपची कामे खोळंबली आहेत. याचा परिणाम आता दिसून येत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बागायती पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी दयावे लागते. मात्र, काही ठिकाणी नादुरुस्त झालेले ट्रान्सफॉर्मर ऑक्सिजन अभावी दुरुस्त होऊ शकले नसल्याने वीज उपलब्ध नाही. 2-3 दिवसाच्या आत ट्रान्सफॉर्मर दुरुस्त होऊन येत असे परंतु सध्या 15 दिवस उलटुनही मिळत नाही. पिकांच्या चिंतेने शेतकरी आता ट्रान्सफॉर्मर कधी दुरुस्त होईल याच्या प्रतीक्षेत आहेत.
सध्या ऑक्सिजन अभावी ट्रान्सफॉर्मर दुरूस्तीत मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. एजन्सीला कडून दुरुस्ती होताच ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना देण्यात येतील- सुहास मिसाळ ,उपविभागीय अधिकारी ,महावितरण कंपनी माजलगाव