अविनाश कदम
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : शेतकरी पावसाळा सुरू झाला की पेरणीची लगबग सुरू करतात. पुन्हा पावसाने उघडीप दिल्यावर नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर पेरणीला सुरुवात करावी, असा सल्ला आष्टी कृषी विभागाने दिला आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुरेसा पाऊस नाही. काही गावांमध्ये पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत. तरी काही गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. पेरणी झालेल्या गावांमध्ये मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आणखी पावसाने अशी ओढ दिल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. यामुळे शेतकऱ्यांनी किमान ७ इंच ओल झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन आष्टी कृषी विभागाच्यावतीने केलेले आहे.
कडा, धामणगाव, धानोरा, आष्टी तालुक्यांच्या पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. तर आष्टीच्या पूर्वेकडील गावात खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मागील ४ ते ५ दिवसांपासून दमदार पाऊस झाला नाही. येत्या २ ते ४ दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.
.....
पेरणीयोग्य पावसानंतरच पेरणी करा
जोपर्यंत ८० ते १०० मि.मी. पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. यापेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास पुरेशा प्रमाणात ओलावा नसतो. जमिनीच्या उष्णतेमुळे बियाणे अतिशय कमी प्रमाणात अंकुरते व बियाणे जळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार बियाणे पेरण्याची वेळ येऊ शकते. यामध्ये आर्थिक फटका बसतो. पैसे आणि वेळपण अधिक खर्च होतो. याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दुबार पेरणीचा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.
-राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.
...
सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावली. यंदा पाऊस चांगला राहील या आशेने शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदीस प्रारंभ केला होता. कऱ्हेवडगांव परिसरातील संपूर्ण पेरणीची कामेदेखील पूर्ण झाली आहेत. आठ दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेरणी झालेली पिके आता कुठे वर दिसू लागताच कडक उन्हामुळे ती करपण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
- राम नागरगोजे, शेतकरी, कऱ्हेवडगांव
.....
मंडळनिहाय पर्जन्यमान
आष्टी - ६३.५ मि.मी.
कडा - ६०.२ मि.मी.
टाकळसिंग - ४५.४ मि.मी.
दौलावडगांव - ६५.९ मि.मी.
धामणगांव - ५१.४ मि.मी
धानोरा - ३८.६ मि.मी.
पिंपळा - १२२ मि.मी.