कडा : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून मिळालेल्या सौर पंपाचा वापर करून शेतकरी पिकाला पाणी देण्याबद्दल आत्मनिर्भर होत आहेत. आष्टी तालुक्यातील शेरी येथील दादासाहेब सुरेश ढोबळे नामक तरुण शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला आहे. दादासाहेबची तीन एकर शेती आहे. या शेतीला पाणी देण्यासाठी त्याला मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून पंप मिळाला आहे. वीज उपलब्ध नसणे किंवा विजेचा लपंडाव यासारख्या अडचणीतून त्याची सुटका झाली आहे. कांदा, ऊस, गहू, घास या पिकांबरोबर त्याची लिंबोणीची बागही बहरणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषिपंपासाठी ऑनलाईन नावनोंदणी करावी लागते. आपल्या शेतीला शाश्वत पाणीपुरवठा करणारी विहीर, बोअर असावे. मात्र तिथे आधी विद्युत पुरवठा नसावा एवढीच या योजनेची महत्त्वाची अट आहे. ढोबळे याने अर्ज करून नियम, अटींची पूर्तता झाल्यावर त्याला १६ हजार ५६० रुपये भरावे लागले. त्यानंतर त्याला १ लाख ५४ हजार रुपयाचे सौर कृषिपंप साहित्य मिळले. यात सौर पॅनल, त्याचे स्ट्रक्चर, मोटार, केबल आणि घरी वापरण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करून चालवले जाणारे दिवे इत्यादी साहित्य मिळाले. ज्या कंपनीकडून हे साहित्य पोहोच झाले त्यांनीच त्याची उभारणी करून दिली. त्याने शेतात बोअर घेतलेले असून जेव्हा दिवसभर सौर विद्युत पुरवठा सुरू असतो तेव्हा बोअरवरील मोटार चालू करून शेतीला पाणी देता येते. या सौर कृषिपंपामुळे शेतीला दिवसा पाणी देणे शक्य झाले असून, आता वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि वीज बिल या दोन्हीपासून मुक्तता मिळाल्याचे दादासाहेब ढोबळे याने सांगितले .
फोटो- दादासाहेब ढोबळे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक ढवण.