लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील शेतक-यांना २०१९-२० च्या हंगामासाठी पीक कर्जाचे हेक्टरी दर वाढविण्यात आले आहेत. १४ जानेवारी रोजी तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार ऊसाला हेक्टरी १ लाख २० हजार तर कापूस, सोयाबीनला हेक्टरी ५२ हजार रुपये कर्जदर ठरविला आहे.येथील जिल्हा बँकेच्या श्रीपतराव कदम सभागृहात तांत्रिक सल्लागार समितीची बैठक झाली. सभेस बँकेचे अध्यक्ष व तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आदित्य सारडा, जिल्हा उपनिंबधकांचे प्रतिनिधी डी. बी. फलके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वरिष्ठ अधिकारी डी. व्ही. देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी जे. डी. माळेवाडीकर, राज्य बँकेचे प्रतिनिधी एल. एन. शेंडगे, जे. बी. कुलकर्णी, शेतीनिष्ठ शेतकरी व कृषी पंडित व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकारी या सभेस उपस्थित होते.राज्याचे सहकारी संस्थांचे सहकार आयुक्त व निबंधकांनी २२ आॅक्टोबर रोजी २०१९-२० साठी प्रति हेक्टरी किमान पीककर्ज दर निश्चित केले होते. कमाल मर्यादा निश्चित करण्याबाबत जिल्हास्तरीय तांत्रिक समिती व संबंधित बँकेला सूचित केले होते. बीड जिल्ह्यातील पाऊस, पीकपरिस्थिती, शेतीसाठी लागणारे साहित्य, औषधे, खते, मजुरी आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. जिल्हा बँकेच्या व्यतिरिक्त बरेच शेतकरी राष्ट्रीयकृत आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून कर्ज घेतात.२०१९-२० साठी पीक कर्जदर निश्चित करताना प्रामुख्याने कापूस सोयाबीन व ऊस तसेच इतर पिकास सध्याचे मजुरी आणि शेती वरील खर्च विचारात घेता समितीने हेक्टरी कर्जमर्यादेत वाढीचा निर्णय घेतला. त्यानुसार सभेमध्ये प्रामुख्याने ऊस पिकासाठी प्रति हेक्टरी १ लाख २० हजार रुपये तसेच कापूस आणि सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्टरी ५२ हजार रु पये आणि उर्वरित सर्व पिकांना राज्य समितीने दिलेल्या दरापेक्षा जवळपास पाच टक्क्यांपर्यंत वाढ दिली आहे. पेरू व सीताफळासाठी समितीने प्रती हेक्टरी ५५ हजार रु पये पीककर्ज दर ठरविला आहे......शेती साठी लागणारे साहित्य बियाणे औषधे खते मजुरी वाहतूक खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने सर्व बाबींचा विचार करून पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पीककर्ज दरामध्ये वाढ करण्याचे आदेश समितीला दिले होते. राज्यस्तरीय समितीने निश्चित केलेल्या पीक कर्ज दरात स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन पाच टक्क्यांपर्यंत बदल करण्याबाबत अधिकार जिल्हास्तरीय तांत्रिक समितीला होते. त्यानुसार समितीने हा निर्णय घेतला आहे. याचा शेतकºयांना फायदा होणार आहे.- आदित्य सारडा, अध्यक्ष,जिल्हा बॅँक तथा तांत्रिक सल्लागार समिती, बीड.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पीककर्जात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:52 PM
जिल्ह्यातील शेतक-यांना २०१९-२० च्या हंगामासाठी पीक कर्जाचे हेक्टरी दर वाढविण्यात आले आहेत. १४ जानेवारी रोजी तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ठळक मुद्देआगामी हंगामाची चाहूल : तांत्रिक सल्लागार समितीचा निर्णय, उसाला मिळणार हेक्टरी १ लाख २० हजार तर कापूस, सोयाबीनसाठी ५२ हजारांचे कर्ज