बीड : मागील दोन आठवड्यांपासून गारठा वाढल्याने ज्वारीच्या वाढीला फटका बसत असून गहू, हरभर्याला सर्वोत्तम वातावरण असले तरी किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. दुसरीकडे कृषी विभागाने व तज्ज्ञांनी आवाहन करुनही ज्या शेतकर्यांनी कापूस उपटला नाही, त्यांच्या कापसाला बोंडे फुटू लागली आहेत.
बीड जिल्ह्यात यंदा पाऊसप्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहिल्याने शेतकरी विविध पिके घेत आहेत. यंदा रबी हंगामात ज्वारीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असलीतरी अलीकडच्या कालावधीत वाढत्या थंडीमुळे ज्वारी उत्पादकांना त्रास सहन करावा लागत आहे. गारठ्यामुळे उशिरा पेरलेली ज्वारी काकडली आहे. पोटर्यात आलेल्या ज्वारीमध्ये कणसाला पीळ पडण्याची शक्यता वाढली असून साखर चिकटाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ‘खडखड्या’ रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. काही ठिकाणी ज्वारीवर मावाची शक्यता असल्याने शिफारशीप्रमाणे उपाययोजना शेतकर्यांना करावी लागणार आहे. खडखड्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी १०० लिटर पाण्यात २ किलो युरियाची फवारणी तसेच मावा असेल तर त्यात १५० मि.ली. रोगर (डायमेट्रेट) ची फवारणी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावी लागणार आहे.
लहरी निसर्ग बोंडअळीमुळे फटका बसल्यानंतर शेतकर्यांनी कपाशी उपटून गहू आणि हरभर्याचा पेरा केला. कापसातून नुकसानीची कसर यातून काढता येईल अशी अपेक्षा असतानाच निसर्गाच्या लहरीपणामुळे गहू आणि हरभर्यावर कडाक्याच्या थंडीचा परिणाम झाला आहे.
साखरचिकटा, खडखड्याचा प्रादुर्भावसुरुवातीला तसेच वेळेवर पेरा केलेली ज्वारी दाणे भरुन परिपक्व झाल्याने कसलाही धोका नाही, मात्र उशिरा पेरणी केलेल्या ज्वारीची वाढ खुंटत आहे, मात्र बीड जिल्ह्यात हे क्षेत्र कमी आहे. वाढत्या थंडीमुळे पेशीरस पानांवर साखरेप्रमाणे पसरत आहे. साखरचिकटादेखील वाढीला अडथळा ठरत आहे. उशिरा पेरलेल्या गव्हावर खोडकिडी, मावा, तांबेरा तर हरभर्यावर मर आणि घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित शेतकर्यांनी शिफारशीनुसार फवारणी करणे आवश्यक बनले आहे.
उन्हाळी पिकांचे वेधयावर्षी चांगल्या पावसामुळे शेतकर्यांचा उन्हाळी बाजरी, उन्हाळी भुईमुगाचे पीक घेण्याकडे कल वाढत आहे. शिरुर, पाटोदा, गेवराई, बीड तालुक्यात उन्हाळी बाजरी तर बीड, धारुर, वडवणी, शिरुर, पाटोदा तालुक्यात उन्हाळी भुईमुगाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.
कपाशीला बोंडे, पण भीतीगुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानंतर कपाशी उपटण्याचे व पळाट्या जाळून टाकण्याचे तसेच एकही बोंड शेत व परिसरात राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले होते. पाणी उपलब्ध असलेल्या बहुतांश शेतकर्यांनी कपाशी उपटून गहू, हरभर्याचा पेरा केला. परंतु, ज्या कोरडवाहू शेतकर्यांनी नुकसान झालेच आहे, आता काय व्हायचे ते होईल या धाडसाने उपटण्याचा खर्च टाळून कपाशी तशीच ठेवली. हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. थंडीमुळे या कपाशीला बोंडे फुटू लागली आहेत. त्यामुळे त्यांच्या आशा पल्लवीत झाल्याचे दिसून येत आहेत.
बोंडअळीचा धोका लक्षात घ्यावा कापसाला बोंडे फुटत असलीतरी गुलाबी बोंडअळीचा धोका लक्षात घ्यायला हवा. बोंडामध्ये सात महिने सुप्त अवस्थेत ही अळी राहते. त्यामुळे याचा परिणाम पुढील हंगामात पहायला मिळेल. आॅगस्टनंतर कपाशीवर होणारा प्रादुर्भाव दिसून येईल.त्यामुळे कापूस हा उपटलाच पाहिजे.- रामेश्वर चांडक, कृषी तज्ज्ञ.
जिल्ह्यातील पेरा ज्वारी १ लाख ५१ हजार ३०७गहू ३५ हजार ९०२ हरभरा १ लाख १५ हजार ४१