माजलगाव : गेल्या तीन वर्षांपासून माजलगाव तालुक्यात व परिसरात दुष्काळी परिस्थिती आहे. कापसाचे पीक जळून गेलेले आहे तर उसाला हुमनीने ग्रासले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी, या मागणीसाठी आज शेतकरी संघर्ष समितीने बाजार समिती कार्यालयासमोर हुमणी लागलेल्या उसाची होळी केली.
पावसा अभावी शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. सोयबिन, कापूस इत्यादी पिके पूरती हातची निघून गेलेली आहेत. कारखानदारांच्या चुकीच्या धोरणामुळे या वर्षी बहुसंख्य शेतकऱ्यांनी 265 जातीचा ऊस सोडून इतर वाणाचा उस लावला. मात्र त्यावर हुमणी रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यातून दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने भाई गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले आहे. आंदोलनाची सुरुवात आज सकाळी येथील बाजार समितीच्या कार्यालयासमोर हुमणीने वाळलेल्या उसाची होळी करून करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.