कडा (ता. आष्टी, जि. बीड) : गंगापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथील दोन व्यापाऱ्यांनी आष्टी तालुक्यातील कुंभारवाडी येथील आठ शेतकरी यांना बोगस कांदा बियाणे देऊन साडेबारा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी एकाला अटक केली असून, अन्य एक फरार आहे. ही घटना आष्टी तालुक्यातील कुंभारवाडी येथे घडली आहे.
आष्टी तालुक्यातील कुंभारवाडी येथील शेतकरी महेश सुनील होळकर यांच्यासह आठ शेतकऱ्यांनी तांदुळवाडी(ता.गंगापूर) येथील व्यापारी भगवान घनसिंग सिंघरे, संदीप कापुरचंद राजपूत यांनी साडेबारा लाख रुपयांचे कांदा बियाणे घेतले, पण नंतर त्याची उगवण झाली नाही. हे बोगस बी असल्याची खात्री होऊन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, बोगस कांदा बियाणे देऊन फसवणूक केल्याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात महेश होळकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी भगवान घनसिंग सिंघरे, संदीप कापुरचंद राजपूत रा.तांदुळवाडी ता.गंगापूर या दोघा जणांवर ७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता. यातील भगवान घनसिंग सिंघरे याला शनिवारी रात्री गंगापूर येथून ताब्यात घेऊन रविवारी आष्टी न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, अन्य एक आरोपी संदीप राजपूत फरार आहे. तपास आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे करीत आहेत.