- अनिल महाजन
धारूर : घरातील आर्थिक परिस्थिती बिकट असताना शिक्षण घेण्याची उर्मी बाळगत औषधनिर्माणशास्त्र विषयात बीफार्म, एमफार्म पूर्ण केलेला आरणवाडी येथील दिलीप वामन शिनगारे ५ जानेवारी रोजी युरोपमध्ये संशोधनासाठी जाणार आहे. यासाठी ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आयर्लंड, गॅलवे’ने त्याला प्रतिमाह १ लाख ३५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली आहे.
दिलीपचे सातवीपर्यंतचे शिक्षण आरणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत व नंतर अहमदपूर येथे १२ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळाल्यामुळे दिलीपने नाशिक येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. संशोधनात करिअरचा निर्णय घेत त्याने गेट परीक्षेत २ हजार ६७ रँक मिळविला. यामुळे त्याला पंजाब राज्यातील मोहाली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (नायपर) संस्थेत औषधनिर्माणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. नंतर गुजरातमधील निरमा विद्यापीठात रिसर्च फेलो म्हणून संशोधन सुरू केले. पुण्यातील नामांकित राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) संस्थेत एका प्रकल्पात रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करतानाच आयर्लंड येथील विद्यापीठात संशोधनासाठी दोन महिन्यांपूर्वी निवड झाली. पासपोर्ट, संबंधित देशाचा व्हिसा मिळाल्यानंतर दिलीप ५ जानेवारी २०२२ रोजी आयर्लंडला जाणार आहे. त्याचे पीएचडीचे संशोधन ४ वर्षे चालणार आहे.
मेडिकल डिव्हाइस बनविण्याचे संशोधनदिलीप शिनगारे हा युरोपातील ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आयर्लंड, गॅलवे’ या नामांकित विद्यापीठात प्रोफेसर जेरांड वॉल, प्रोफेसर ऍनी मॅरी यांच्या नेतृत्वात पीएचडीचे संशोधन करणार आहे. हे संशोधन बायोमटेरियल, मायक्रोबायलॉजी आणि मोल्युक्युलर बायलॉजी या विषयातील मेडिकल डिव्हाइस बनविण्याचे असणार आहे. हा आयर्लंड सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यासाठी दिलीपला चार वर्षे प्रतिमहिना १५५० युरो (भारतीय चलनात अंदाजे १ लाख ३५ हजारांपेक्षा अधिक) शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.
शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमीधारूर तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील आरणवाडी येथील दिलीपचे वडील वामन शिनगारे शेतकरी आहेत. त्यांना पाच एकर जमीन आहे. नापिकी, दुष्काळ, त्यात अत्यल्प उत्पादन आणि तीन मुलींच्या लग्नाच्या खर्चामुळे कर्जबाजारी व्हावे लागले आहे. यातच दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढत होता. दिलीपचा एक भाऊ एमपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे. वामन शिनगारे यांनी कर्ज घेऊन मुलांचे शिक्षण सुरूच ठेवले. त्याचे फळ मिळाल्याची भावना पंचक्रोशीत व्यक्त होत आहे.