माजलगाव (बीड) : जिल्ह्यातील ऊस प्रश्न आणि गेवराई तालुक्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणी साखर आयुक्त व प्रादेशिक संचालक यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा तालुक्यातील आनंदगाव येथे ऊसाच्या फडातून शेतकऱ्यांनी आज सकाळी काढली. अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असून शेतकरी हतबल झाल्याने टोकाचे पाऊलं उचलत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
गेवराई तालुक्यातील शेतकर्याने काही दिवसांपूर्वी शेतातील ऊस पेटवून देऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येमागे दोषी म्हणून साखर आयुक्त व औरंगाबाद येथील प्रादेशिक सहसंचालक असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत आक्रमक शेतकऱ्यांनी आज सकाळी तालुक्यातील आनंदगाव येथे साखर आयुक्त व औरंगाबाद येथील प्रादेशिक सहसंचालक यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.
यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी ऊस लागवड केल्यानंतर ऊसाच्या नोंदीची पावती शेतकर्यांना देण्यात यावी, त्याची अंमलबजावणी साखर आयुक्त कार्यालयाने केली नसल्यामुळे, तसेच 265 जातींचा शेतकर्यांचा ऊस साखर कारखान्याने घेऊन जावा अशी मागणी केली. 265 जातीचा ऊस शेतकऱ्यांना परवडतो. एक महिना पाणी नसले चालते, रान डुकरे खात नाही, वजनदार भरतो यासर्व कारणांमुळे कारखानदार सदरील ऊस घेऊन जात नाहीत. यामुळे साखर आयुक्त कार्यालय हे शेतकऱ्यांच्या बाजूने नसून कारखानदारांच्या बाजूने आहेत. त्यामुळे नामदेव जाधवसह इतर ऊस उत्पादक शेतकर्यांचा बळी गेला. साखर आयुक्त कार्यालय हे कोटयावधी शेतकर्यांचे हित बघण्यासाठी निर्माण केलेले आहे. पण शेतकर्यांचे ते हित पाहत नाहीत, असा आरोप आंदोलकांनी केला. यामुळे तिरडी मोर्चा गंगाभिषण थावरे यांच्या नेत्वाखाली काढण्यात आला होता. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.