- अनिल महाजनधारूर (जि. धारूर) : तालुक्यातील अंजनडोह येथील शेतकरी कन्येने राज्यात डंका वाजवत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( MPSC Exam Result) परीक्षेत एनटीसी प्रवर्गातून राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. परिस्थितीवर मात करून यश मिळविलेल्या या कन्येचे नाव आहे अश्विनी बालासाहेब धापसे. तिचे आता पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून, लवकरच ती पोलीस उपनिरीक्षक म्हणून लोकसेवा करणार आहे. तिच्या खांद्यावर ‘स्टार’ लागणार असल्याने सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ पोलीस उपनिरीक्षक पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एनटीसी गटात मुलींतून धारूर तालुक्यातील अंजनडोह गावची अश्विनी बालासाहेब धापसे हिने प्रथम क्रमांक मिळवला. अश्विनीची घरची परिस्थिती हलाखीची आहे. वडिलांना अवघी पाच एकर शेती. बालासाहेब धापसे यांनी मेंढ्या सांभाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळत दोन मुले व मुलींचे शिक्षण पूर्ण केले. अश्विनीने दहावीपर्यंतचे शिक्षण अंजनडोह येथे तर कोल्हापूर येथे अभियांत्रिकी शिक्षण घेतले. औरंगाबाद येथे मोठा भाऊ योगीनंद यांच्यासोबत राहून त्यांच्या प्रेरणेने स्वअध्ययन करत पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केले. यात तिला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले.
कुटुंबाची साथ अनमोलअधिकारी होण्याचे माझे स्वप्न होते. अनेकदा परिस्थिती आडवी आली; परंतु मी खचले नाही. वडिलांच्या घामाचे यश मिळवून चीज केले. मोठ्या भावापासूनही मला खूप प्रेरणा मिळाली. माझ्या या यशात कुटुंबाची साथ अनमोल राहिली. माझे हे सर्व यश त्यांनाच समर्पित करते.- अश्विनी धापसे