अंबाजोगाई : शेतीला पाणी देण्यासाठी सलग आठ तास सुरळीत वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी देवळा येथील शेतकरी महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
अंबाजोगाई तालुक्यात देवळा, पाटोदा, ममदापूर, अकोला, तडोळा, मुडेगाव, अंजनपूर, कोपरा, आपेगाव, धानोरा व परिसरातील गावे ग्रीनबेल्ट म्हणून ओळखली जातात. सध्या मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यातून कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. कॅनॉलला पाणी सुटल्यामुळे उसाला व इतर पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र, या परिसरातील शेतकऱ्यांनी वीजबिले भरूनही महावितरणकडून वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. जरी वीजपुरवठा सुरू असला, तरी तो अत्यंत कमी दाबाने सोडला जातो. त्यामुळे विद्युतपंप चालत नाहीत. तर, कमी दाब असल्यामुळे अनेक विद्युतपंप निकामी झाले आहेत. याचा आर्थिक भुर्दंडही शेतक-यांना सहन करावा लागतो. धरणातून कॅनॉलला ठरावीक कालावधीसाठी पाणी सोडले जाते. पुरवठा सुरळीत नसल्याने पाणी द्यायचे कसे? पाण्याची उपलब्धता असताना जर विद्युतपुरवठा नसेल, तर उपलब्ध असणा-या पाण्याचा उपयोग काय? अशी स्थिती शेतक-यांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतक-यांना सलग आठ तास विद्युतपुरवठा उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी देवळा व परिसरातील शेतकरी महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
यासंदर्भात महावितरणचे सहायक अभियंता संजय देशपांडे यांच्याकडे विचारणा केली असता देवळा व धानोरा हे गाव सबस्टेशनच्या शेवटच्या टोकावर आहे. सर्वच शेतकरी शेतीला एकदम पाणी देत असल्याने लोड येत असल्यामुळे विद्युतप्रवाहात अडथळे निर्माण होत आहेत. यावर मार्ग काढला जाईल, असे देशपांडे यांनी सांगितले.
===Photopath===
070421\avinash mudegaonkar_img-20210407-wa0063_14.jpg