- नितीन कांबळेकडा (बीड) : आष्टी तालुक्यात शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरावर गारपीटीचा ततडाखा बसल्याने अरणविहरा, देवळगाव घाट, तागडखेड, घाटापिंपरी, देवळाली, शेडाळा, वेलतुरी, सावरगांव, पिपळगांव घाट यासह परिसरातील शेती पिकांसह फळबागाचे मोठे नुकसान झाले होते. आज सकाळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी अरणविहरा व परिसरात थेट बांधावर जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या दरम्यान त्यांनी डांळिब, संत्रा, केळी, चिकु या फळबांगाची व कांदा, मका, कडवळ या पिकाची आणि घराची झालेली पडझड यांची पाहणी केली. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी धीर धरावा खचुन जाऊ नये. पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळेल. त्याच बरोबर घराची पडझड झालेल्या व्यक्तीला देखील मदत मिळणार आहे. भिजलेले अन्न धान्य यांचीही व्यवस्था केली जाईल असा धीर देत नुकसानीचा पाहणी दौरा करून कृषी आयुक्त चव्हाण मार्गस्थ झाले.
यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक बाबासाहेब जेजुरकर, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे, तहसीलदार विनोद गुंड्डमवार, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, सरपंच आण्णासाहेब शिरसाट, तलाठी,कृषी सहायक यांच्यासह कर्मचारी उपलब्ध होते.
नुकसानभरपाई मिळेलफळाचा सडा, केळीचे पडलेले घड, कांदा यासह इतर नुकसान झालेल्या पिकांची कृषी आयुक्त चव्हाण यांनी शेतकऱ्यांना धीर देत हताश होऊ नका, पंचनामे करून नुकसान भरपाई मिळेल असा विश्वास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर दिला.