शिरूर कासार : सोमवारी सकाळपासूनच आभाळ झाकाेळून आले आहे तर अल्पशा पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा एकदा शेतकरी धास्तावला आहे. यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली, त्यामुळे जलाशयही तुडुंब भरले आहेत. खरीप हंगामात झालेली हानी भरून काढण्यासाठी रब्बी हंगाम घेण्यात शेतकरी व्यस्त आहेत. पावसामुळे थंडी वाढेल आणि गहू, हरभरा, ज्वारी पिकाला ती पोषक ठरेल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, त्या प्रमाणात थंडी पडलेली नाही. उलट दोन-तीन दिवसांपासून थंडी गायब होऊन आभाळ झाकाेळले आहे. सध्या शेतात तूर काढणीचे काम सुरू आहे. काही तूर घरी आली असली, तरी आणखी तूर शेतात उभी आहे. काही काढून पसारा तसाच शेतात आहे. पावसाळी वातावरण शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरल्याने ते चांगलेच धास्तावले आहेत. शिवाय गहू, हरभरा पिकाला काहींनी पाणी दिले आहे. अशावेळी पाऊस आल्यास तो पिकासाठी धोकादायक ठरेल, अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. ज्वारीच्या पिकावरही चिकटा व मावा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगितले जात आहे.
शेतकऱ्याला पुन्हा पावसाची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 4:05 AM