खतांच्या भाववाढीबरोबर डिझेलचा भडका उडाल्याने आधुनिक यंत्राद्वारे केली जाणारी शेतीच्या मशागतीचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. शेतकरी पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक शेतीकडे वळला असून, जवळपास ७५ टक्के शेतकऱ्यांनी बैल बारदाना मोडला आहे. नांगरणी, मोगडणे, पेरणी आधुनिक यंत्राच्या साह्याने करू लागला आहे.
डिझेलचे भाव भडकल्याने शेतकऱ्यांना एक एकर नांगरणी २२०० रुपये, पाळी १२०० रुपये, मोगडणे १२००, पेरणी १२०० असे पैसे मोजावे लागत आहेत.
बियाणे ३००० रुपये, खत १८०० रुपये, कीटकनाशके कोळपणी, काढणी, मळणीकरून जवळपास वीस हजार रुपये एकरी खर्च होत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने शेतकऱ्यांना सतत तोटा सहन करावा लागत आहे.
खरीप, रबी हंगामांतील सुगी काढणीला येईपर्यंत भाव बदलले असतात. शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी येण्यासाठी बाजारपेठेत मालाला उंची भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांची स्वतंत्र बाजारपेठ असणे गरज आहे. तसे न होता व्यापाऱ्याच्या मालाला भाव मिळत असल्याचे चित्र आतापर्यंत पहायला मिळाले आहे. डिझेल वाढले, शेतीची मशागत महागली त्याचबरोबर खताच्या किमतीत भरमसाट वाढ झाली. काही खत कंपन्यांच्या एका पोत्याची किंमत जवळपास ५० टक्के वाढली, त्याच पटीने शेतकऱ्यांच्या शेती मालाला भाव मिळणे गरजेचे आहे.
दरवर्षी खरीप रबी हंगामात शेतकऱ्यांना नवीन संकटाशी सामना करावा लागत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम पिकावर होत असल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे खर्च आणि उत्पादन यात मोठी तफावत राहत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाऐवजी नुकसान सहन करावे लागत आहे.
अशोक कदम, प्रगतशील शेतकरी, तडोळा
खताची दरवाढ, डिझेलचा भडका मशागतीची दरवाढ यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरवाढीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढणार असल्यामुळे डिझेल व खताच्या किमती कमी करण्याची मागणी केली जात आहे.
अशोक कचरे, प्रगतशील शेतकरी, पूस