बीड : तालुक्यातील लिंबागणेश परिसरातील शेतकऱ्यांना वन प्राण्यांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत असून शेतातील पिके उद्ध्वस्त होत असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने वन विभाग गाढ झोपेत असल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांतून उमटत आहे. रंगीबेरंगी साड्यांचे कुंपण लावून तर हल्ल्यापासून संरक्षणासाठी शेतकरी मळा करून रात्री जागून काढत आहेत.
बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश पंचक्रोशीतील डोंगराळ भागातील पोखरी (घाट), पिंपरनई, बेलगाव, फुकेवाडी, सोमनाथवाडी आदी परिसरातील शेतशिवारात संचार करणाऱ्या रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे. झुंडीच्या झुंडी शेतातील उभ्या पिकांची नासाडी करत आहेत. त्यामुळे संरक्षणासाठी शेतकरी विविध उपाय करीत आहेत.
शेतातील ज्वारी, भुईमूग, बटाटा आदी उगवलेल्या पिकांची डुकरांकडून खाण्यापेक्षा नासधूस जास्त होत आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रानडुकरे घाबरतात म्हणून रंगीबेरंगी साड्यांचे कु़ंपण करण्यात येत असून रानडुकरांच्या हल्ल्यापासून संरक्षण म्हणून शेतावर राखण करणाऱ्या शेतकऱ्यांना उंचावर 'मळा' करून रहावे लागते.
वन आधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावेवन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये, तसेच पिकांची नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी वन विभागाची आहे. परंतु वन विभाग मात्र गाढ झोपेत असून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्यांना गांभीर्य दिसून येत नाही. या प्रकरणी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, बीड, वैभव काकडे यांच्याकडे केली आहे.