वडवणी (जि. बीड) : शहरातील संत भगवानबाबा चारा छावणीत जुन्या वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमंत लक्ष्मण नागरगोजे (४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
वडवणी शहरापासून १ किलोमीटर अंतरावर संत भगवान बाबा चारा छावणी आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बुरूजदरा वस्तीवरील शेतकरी श्रीमंत लक्ष्मण नागरगोजे आणि चंद्रसेन आप्पा मुंडे, शहादेव चंद्रसेन मुंडे, मारोती चंद्रसेन मुंडे (सर्व रा. बुरूजदरा) यांच्यात जुन्या कारणावरून भांडण जुंपले. यात श्रीमंत नागरगोजे यांना शहादेव मुंडे यांनी धरले व चंद्रसेन मुंडे यांनी त्यास काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीत श्रीमंत नागरगोजे हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. सोमवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शवविच्छेदन करून आल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह थेट वडवणी पोलिस ठाण्यात आणला. गुन्हा दाखल होईपर्यंत तेथून हलणार नसल्याचा पवित्रा घेतला. याप्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली. शिवाजी लक्ष्मण नागरगोजे (३५) यांच्या फिर्यादीवरून वडवणी ठाण्यात चंद्रसेन मुंडे, शहादेव मुंडे, मारोती मुंडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लवकरच आरोपींना अटक करूछावणीमध्ये जुना राग मनात धरून एकाचा खून झाला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पकडण्यासाठी तीन पथक रवाना केली आहेत. लवकरच आरोपींना अटक होईल. - सुरेश खाडे , सहायक पोलीस निरीक्षक