अंबाजोगाई : नवीन कृषिपंप वीज धोरणात शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्याचे नियोजन करण्यात आल्याची घोषणा ऊर्जामंत्र्यांनी केली, परंतु शेतकऱ्यांना अद्याप दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. अजूनही रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरूच आहे. रात्री जागून शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
हातपंप दुरुस्तीची मागणी
पाटोदा : तालुक्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी शासनाच्या वतीने गावोगावी हातपंप बसविण्यात आले. पूर्वी या हातपंपावर संपूर्ण गावाला पाणी मिळत असे. मात्र, आता गावोगावी पाणीपुरवठा योजना झाल्याने हातपंप नादुरुस्त अवस्थेत आहेत. भारनियमनाच्या कालावधीत आजही अनेक गावांना हातपंपांचा आधार मिळतो. त्यामुळे नादुरुस्त हातपंप दुरुस्तीची मागणी होत आहे.
विद्युत रोहित्रांना संरक्षण कवाडे नाहीत
पाटोदा : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक विद्युत रोहित्राचे बॉक्स उघडे आहेत. संरक्षण कठड्यांचा अभाव असल्याने संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरातील विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड होतो. उघडे फ्युज, तार व हे बॉक्स उघडेच असतात. या प्रकाराकडे महावितरणचे मोठे दुर्लक्ष होत आहे. संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी रोहित्रांना संरक्षण कवाडे भिंत करावीत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
दुचाकी चोर सक्रिय
माजलगाव : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरी गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. पोलिसांना शोध लागत नसल्याचे चित्र आहे.
रस्ते दुरुस्तीचा अडथळा
अंबेजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. कामे करण्यासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळे होत आहेत. खड्डे चुकविताना लहान-मोठ्या अपघातांत वाढ झाली आहे.