वैशाली पाटील
: छोटेवाडीत बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
गंगामसला : आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. या माहिती व तंत्रज्ञानाच्या आधारे सर्वच क्षेत्रात फार मोठी भरारी जगाने घेतलेली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या हितासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान समृद्धीसाठी शिकावे, असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले. माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर ई-पीक पहाणी मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या.
छोटेवाडी येथील रामकृष्ण प्रधान यांच्या शेतात परिसरातील शेतकऱ्यांना ई-पीक पहाणी या ॲप वापरासंदर्भात रविवारी माहिती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.
दरवर्षी खरीप,रब्बी,उन्हाळी हंगामात शेतात पेरणी केलेल्या पिकाची नोंद पीक पेरा म्हणून ७/१२ वर घेतली जाते. हे काम यापूर्वी तलाठ्यांना शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कोणते पीक पेरणी केले आहे, याची प्रत्यक्ष पाहणी करून त्याची नोंद ७/१२ ला करावी लागत असे. एखाद्या गावचे शिवाराचे क्षेत्र मोठे असले तर त्याची पाहणी करणे तलाठ्यांना शक्य होत नव्हते. ही पीक पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ई-पीक पाहणी ॲप आणल्याचे तहसीलदार वैशाली पाटील म्हणाल्या. त्यामुळे स्वतः शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कोणत्या पिकाची पेरणी केली, दिनांक,जलसिंचनाची साधने इत्यादी माहिती नमूद करून या ॲपवर अपलोड कशा पद्धतीने करावी तसेच त्यासाठी ई- पीक पाहणी या लिंकचा वापर कसा करावा याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तलाठी सुभाष गोरे, सरपंच अंगदराव कटके, उपसरपंच रोषनकुमार राठोड, कोतवाल गणेश खेत्री, नारायण खेत्री, केरबा तपसे, शेतकरी भास्कर प्रधान, राम प्रधान, मदन राठोड, भागवत इंगळे, हनुमान इंगळे, आरूण कटके, सोनबा बागल, बाबुराव चोरगे, दगडु सोळंके, दिलीप राठोड, संजय दळवी, विठ्ठल सोळंके यांच्यासह परिसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.