केज (बीड) : तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी आज आडस येथून केज तहसील कार्यालयवर शेतकर्यांनी पायी मोर्चा काढला.
आज सकाळी नऊ वाजता आडस येथून निघालेला पायी मोर्चा दुपारी साडेतीन वाजता केज तहसील कार्यालयावर धडकला. पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील खरीपाची उभी पिके करपली आहेत. खरीपाची पिके हातची गेली असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा. शेतकऱ्यांच्या पाल्यांची शैक्षणिक फिस माफ करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. तहसीलदार संजय वरकड यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले.
मोर्चात राम माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोराळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, पंचायत समिती सदस्य उमाकांत भुसारी, दत्तात्रय ठोंबरे, शिवाजी खडके, बालासाहेब केकाण, विजयकुमार सारडा, राम नखाते, अशोक जाधव, शाम गंगात्रे, मोहन तोडकर यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.