- राम लंगे
वडवणी (जि.बीड): शेतकऱ्यांनी उसनवार करून, खाजगी सावकाराचे कर्ज काढून बी-बियाणे, खते घेऊन जूनच्या मध्यंतरी थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसावर पेरणी केली होती. त्यानंतर दोन महिने होऊनही पावसाचा थेंबही न पडल्याने पेरलेले बियाणे उगवून संपूर्णपणे जळून गेले आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांमध्ये शेतकरी संपूर्ण पिकावर नांगर फिरवीत असल्याचे विदारक चित्र सध्या दिसत आहे.
प्रशासनाने तात्काळ खरीप हंगामातील पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.तालुक्यातील एकूण पेरणी योग्य ३२ हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी यावर्षी कापूस १९ हजार ७८ हेक्टर, तूर १ हजार ८३ हेक्टर, सोयाबीन ४ हजार २०० हेक्टर, बाजरी ३ हजार ९२५ हेक्टर, मूग १०० शंभर हेक्टर व इतर पिकांची २ हजार हेक्टरावरील क्षेत्रावर पेरणी झाली. थोड्या पावसाने कापूस उगवला, मात्र वाढ खुंटली.
पाऊसच नसल्याने उभे पीक वाळू लागले. १५ गावांमधील ८० टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तब्बल १३ हजार हेक्टरवरील कापसासह खरीप पिकामध्ये औत घालून आपल्या हाताने पीक मोडून टाकले. चिंचवडगाव, देवडी, वडवणी, कवडगाव, साळींबा, मामला, मोरेवाडी, पिपरखेड, कान्हापूर, लक्ष्मीपूर, ढोरवाडी, चिंचोटी, बाहेगव्हाण, हिवरगव्हाण,हरिश्चंद्र पिंप्री, काडीवडगाव, चिंचाळा, पिप्ां्री, येथील शेकडो शेतकऱ्यांनी कापसाच्या उभ्या पिकात औत घालून कापसाचे पीक आपल्या हाताने उद्ध्वस्त केले. कापसासह सोयाबीन, मटकी, मूग, उडीद या पिकांवरही नांगर फिरवावा लागला. तब्बल १३ हजार हेक्टरवरील खरीप पीक आतापर्यंत उद्ध्वस्त केले आहे. पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी साळींबा येथील शेतकरी दीपक जाधव, मामला येथील शेतकरी अंगद लंगे, चिचोटी येथील शेतकरी सुमंत गोंडे,अॅड राज पाटील यांनी तहसील प्रशासनाकडे व कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली असून, खरीप हंगामात १५ गावांतील पिके जवळपास ८० टक्के नुकसान झाले असून याबाबत कृषी विभागाने पीक परिस्थिती अहवाल तहसीलदार यांना कळविला आहे. चार दिवसांत पाऊस न पडल्यास तालुक्यातील इतर गावातील परिस्थितीही गंभीर बनण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे यांनी दिली.