छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रुईधारूर या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई येथील प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीरचे देवणी पशु पैदास प्रमुख डॉ. प्रफुल्लकुमार पाटील हे होते. कार्यक्रमाला एम. एस. डी. ॲनिमल हेल्थचे क्षेत्रीय व्यवस्थापक कुणाल घुंगर्डे, तुळशीदास सोळंके, सतीश आढाव, सरपंच भागवत गिरी, उपसरपंच सोळंके, तिडके आदी उपस्थित होते.
काळानुरूप शेती ही परवडणारी नाही, त्याकरिता शेती तंत्रात बदल करावा लागत आहे आणि शेतकरी हा बदल घडवून आहेत. तरीसुद्धा शेती परवडत नाही. कारण शेतीतले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना मिळत नाही आणि त्याच कारणाने शेती परवडत नाही. रुई धारूर येथील तरुण शेतकरीवर्ग हा दुग्ध व्यवसायात भरपूर प्रमाणात उतरत आहे. या युवकांना दुग्ध व्यवसायाची अद्ययावत माहिती देत दूध उत्पादन कसे वाढवावे, याचे दाखले डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी दिले. आपल्या मार्गदर्शनात डॉ. प्रफुल्ल कुमार पाटील यांनी शेतकऱ्यांना विस्तृत माहिती दिली. जनावरांचा गोठा हा मुक्त पद्धतीचा असावा. जनावरांना चारा देण्यात येतो, त्या चाऱ्याचा दर्जा वाढवताना खर्च कसा कमी होईल. जो चारा जनावरांना दिला जातो, त्यातला बहुतांश चारा हा वाया जातो, तो कसा वाचला जाईल, कालवडी संगोपन करताना त्या वेतायोग्य कशा बनतील. दूध काढण्याच्या पद्धतीमध्ये बदल काय असावेत? या सर्व विषयांवर डॉ. प्रफुल्ल कुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास गावातील दूध उत्पादक मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे आयोजन सुनील सोळंके आणि बालासाहेब तिडके यांनी केले. अविनाश तिडके यांनी आभार मानले.