लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : रोहिणी, मृग नक्षत्रांत पडलेल्या अल्प स्वरूपाच्या पावसानंतर लगेचच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तसेच पावसामुळे पेरणीचे वेधदेखील शेतकऱ्यांना लागले आहे. मात्र, हा पाऊस मान्सूनपूर्व असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील मुख्य पीक कापूस, सोयाबीन तसेच कडधान्य आहे. मान्सूनपूर्व पडलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. व पेरणीसाठी काही ठिकाणी लगबग सुरू झाली आहे. मात्र, काही ठिकाणी पडलेला पाऊस हा ५ मिमीपेक्षा कमी असल्यामुळे ही ओल जास्त काळ टिकून राहत नाही, असे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे घाईगडबडीत पेरणी केली तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येण्याची दाट शक्यता आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार सरासरी ७५ ते १०० मिमी पाऊस पडला तरच पेरणी करणे गरजेचे आहे.
बीज प्रक्रिया महत्त्वाची
खरीप पेरणीसाठी समाधानकारक पाऊस पडल्यानंतर पेरणी करताना बीज प्रक्रिया करूनच शेतकऱ्यांनी लागवड किंवा पेरणी करावी, यासाठी कृषी विभागाच्या ग्रामपातळीवर काम करणारे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक यांनी बहुतांश गावांमध्ये सोयाबीन बियाणाची उगवणक्षमता प्रयोग केले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी करावे. विक्रीच्या बियाणांसाठीदेखील हा पर्याय अवलंबला गेला तर, उगवणक्षमतेनुसार पेरणी करता येईल.
जिल्ह्यातील खरीप हंगामातील मुख्य पिके
कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, खरीप ज्वारी, मूग, उडीद.
बियाणेखरेदीसंदर्भात
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी विक्रेत्यांकडून पक्की पावती घ्यावी, जेणेकरून फसवणूक टाळण्यास मदत होईल.
मध्यम व भारी जमीन
जिल्ह्यातील मध्यम व भारी जमीन आहे, यामध्ये कापूस सोयाबीन तूर, हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत खरीप भुईमूग, खरीप ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सूर्यफूल अशा प्रकारे पीक पद्धतीचा अवलंब करावा.
७५-१०० मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी लागवड करू नये. कृषी विभागाच्या वतीने वेळोवेळी पेरणीसंदर्भात सल्ला दिला जाईल. दुबार पेरणी टाळण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
- दत्तात्रेय मुळे, जिल्हा कृषी अधीक्षक, बीड
परमिटधारकांनी बियाणे खरेदी करावे
कृषी विभागामार्फत गळीत धान्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रमाणित बियाणे वाटपासाठी लॉटरीत निवड करून लाभार्थी शेतकऱ्यांना परमिट देण्यात आलेले आहेत. अशा परमिटधारक शेतकऱ्यांनी त्या कृषी सेवा केंद्रात जाऊन अनुदानित बियाणे खरेदी करावीत. पुढील दोन दिवसांत शेतकऱ्यांनी बियाणे उचलले नाही तर, त्यांचे परमिट रद्द करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून कळवण्यात आले आहे.
===Photopath===
100621\10_2_bed_20_10062021_14.jpg
===Caption===
बीड शेतकरी