आष्टी : महाराष्ट्र शासनाकडून ‘विकेल ते पिकेल’ धोरणांतर्गत ‘संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान’ राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानातून शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना थेट ग्राहकांशी जोडण्यावर भर देण्यात येणार आहे. या अभियानात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला वाढीव दर मिळणार असून, ग्राहकांना ताजा व दर्जेदार शेतमाल उपलब्ध होणार आहे. या उपक्रमांतर्गत रस्ते, चौक, गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका याठिकाणी इच्छुक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना तात्पुरत्या स्वरूपात शेतमाल विक्रीसाठी परवानगी देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. इच्छुक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे यासाठी लेखी अर्ज करावेत. प्राप्त अर्ज तालुकास्तरीय समितीसमोर ठेवून योग्य अर्जांना समितीची मान्यता घेण्यात येईल व त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी ते शासनाकडे सादर करण्यात येतील. जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी शासनाच्या या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुपेकर यांनी केले आहे.