अंबाजोगाई : शेतकरी बांधवांनी खरीप हंगामपूर्व तयारीसाठी काम करावे. प्रथम टप्प्यात करावयाच्या महत्त्वाच्या कामाबाबत जागरूक राहून कार्यवाही करावी. वाढता उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे आहे. त्याकरिता तूर, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचे घरचे बियाणे वापरावे, असे आवाहन अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले आहे.
ज्या बियाणांची पेरणी करायची आहे. त्या बियाणांची घरगुती पद्धतीने उगवण क्षमता तपासली पाहिजे. योग्य उगवण क्षमतेचे घरचे बियाणे वापरल्यास उत्पादन खर्चात मोठी बचत होईल. बियाणे सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे. येत्या हंगामात फळबाग लागवड करायची असल्यास मग्रारोहयो व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेत पात्र शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज केल्यास या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो. शेतकऱ्यांनी येणारा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी खतांचे नियोजन अगोदरच करावे. कोणत्या पिकांना किती मात्रा द्यायची, याची माहिती कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग यांच्यामार्फत घ्यावी. शेतीची योग्य निगाही ठेवणे गरजेचे आहे. पेरणीपूर्वी जितक्या जास्त पाळ्या होतील तितकी जमीन भुसभुशीत होते. शेतीतील वेगवेगळे काँग्रेस, हरळी गवत यांचा नायनाट करून जमीन सुपीक ठेवावी, असे आवाहन डॉ. ठोंबरे यांनी केले आहे.